रक्षक चौक नव्हे; सुरळीत वाहतुकीचा भक्षक

रक्षक चौक नव्हे; सुरळीत वाहतुकीचा भक्षक

Published on

काळेवाडी, ता. १७ : औंध - किवळे बीआरटीएस मुख्य मार्गावरील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने व्यावसायिक, सर्वसामान्य नोकरदार वर्गाला वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. सकाळ - सायंकाळी औंध दिशेला पुण्याकडे व पुण्यातून हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिस असूनही कोंडी सुटत नसल्याने ती सुरळीत वाहतुकीची ‘भक्षक’ झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेकडून रक्षक चौकात उड्डाणपुलाचे बांधकाम केले जात असून ते पुढील आठ महिने सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या विकासाच्या संदर्भातील काम करताना व खास करून वाहतूक सुरू असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील काम सुरू करताना प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे व ते शक्य नसल्यास तेथील बांधकामाचा सामान्य नागरिक, प्रवासी व वाहतुकदारांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची दखल घेत त्या प्रकारची उपाययोजना करणे हे गरजेचे असते. परंतु तेथे कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

काय आहेत समस्या ?
- पुलाचे काम सुरू केल्यानंतर महापालिकेकडून तात्पुरत्या उपाय योजना
- महत्वाच्या व अत्यावश्यक उपाय योजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
- वाहतुकीला एकच मार्ग, पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविणे अशक्य
- चौकातील मुख्य ठिकाणीच पुलाच्या खांबाची उभारणी
- औंध - हिंजवडी बाजूच्या रस्त्यावरील सुरक्षा रक्षकांची केबिन अडथळा
- औंध लष्करी तळाच्या प्रवेशद्वारापासून सामान्य रुग्णालय रस्त्यातील चेंबरचे खोल खड्डे

वाहतूक कोंडीवरील उपाय
- पोलिस कर्मचारी, स्वयंसेवकांची संख्या वाढविणे
- खडी, बांधकाम साहित्य, सुरक्षा रक्षक केबिन इतरत्र हलविणे
- पदपथ वापरण्याजोगा मोकळा व रस्ता स्वच्छ करणे
- रक्षक चौकाकडून पुण्याकडे वळण घेणारा रस्ता पुन्हा सुरू करणे
- सायंकाळी व रात्रीच्यावेळी मोठ्या वाहनांना प्रवेश बंद
- औंध लष्करी तळासमोरील अरुंद रस्त्याची रुंदी वाढविणे
- चेंबरचे खोल खड्डे बुजविणे, वाहने एका रांगेत जाण्यासाठी सूचनाफलक लावणे

रक्षक चौकात सुचविण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल. लवकर लवकर उपाययोजना करण्यात येतील. हे काम अजून सहा ते आठ महिने सुरू राहणार असून त्याविषयी पोलिस व महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठकीत चर्चा सातत्याने सुरू आहे. लवकरच वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यात येईल.
- संध्या वाघ, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महानगरपालिका


औंध व पिंपळे निलखकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचे वळण सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बरीचशी वाहतूक सुरळीत व सरळ वेगाने चालू आहे. रक्षक चौकातील पुतळ्याजवळील दोन खांब काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना एका बाजूने रस्त्याने जाणे शक्य होईल. रक्षक चौकातील काही उपाययोजना प्रगतीपथावर असून लवकरच त्याविषयी पावले उचलले जातील.
- प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, सांगवी

हिंजवडी येथील एका कंपनीत मी अभियंता असून दररोज मला या रस्त्याने जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु गेल्या महिनाभरापासून वाहतूक कोंडी सातत्याने त्रासदायक ठरत आहे. ८०० मीटर ते एक किलोमीटर अंतराच्या प्रवासास मला जवळपास ३० ते ४० मिनिटे लागत आहेत. नेहमीच घरी व कार्यालयात पोहोचण्यास उशीर होत आहे.
- महेंद्र चव्हाण, आयटी अभियंता


मी नोकरदार महिला असून मला नोकरी व घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी पार पाडावी लागते. परंतु रक्षक चौकातील वाहतूक कोंडीमुळे मला घरी तसेच कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. घरातील व कार्यालयातील कामे करताना या त्रासाचा खूप मोठा परिणाम माझ्या कार्यक्षमतेवर होत आहे.
- हर्षदा पाटील, आयटी कर्मचारी

SVW25A00051, SVW25A00053

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com