‘पोलिस काका’, ‘पोलिसदीदी’ संकल्पना कागदावरच

‘पोलिस काका’, ‘पोलिसदीदी’ संकल्पना कागदावरच

Published on

संदीप सोनार : सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता. १ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत काही वर्षांपूर्वी ‘पोलिसकाका’ आणि ‘पोलिसदीदी’ ही संकल्पना राबविण्यात आली. परंतु, आता ती फक्त कागदोपत्री उरल्याचे चित्र आहे. कोणत्याही शाळेत व महाविद्यालयात याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती अद्ययावत नसल्याचे दिसून येत असून ‘पोलिसकाका’ आणि ‘पोलिसदीदी’ यांचे माहिती देणारा आणि संपर्क क्रमांक असलेला फलकच प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयातून गायब झाला आहे.

काळेवाडी, रहाटणी परिसरात प्राथमिक शाळांपासून माध्यमिक शाळांपर्यंतचे शैक्षणिक नवीन वर्ष नुकतेच सुरू झाले. सोबतच शाळा-महाविद्यालयांबाहेर मात्र टवाळखोर व हुल्लडबाजांची गर्दी दिसून येत आहे. हे तरुण टवाळखोरी, मोटार सायकल व इतर वाहने जोरात चालवत आरडाओरड करत मस्ती करणे, हाणामारी, दांडगेशाही व दमबाजी इत्यादी गोष्टींमध्ये सहभाग घेत आहेत. अशा वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी ‘पोलिसकाका’ आणि ‘पोलिसदीदी’ ही संकल्पना राबवण्यात आली होती. परंतु कालांतराने कोरोना काळ आणि लॉकडाऊननंतर ही योजना फक्त कागदावर असल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमात पोलिस अधिकारी शाळांना भेट देऊन मुलांशी संवाद साधतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या समस्या ऐकतात. हा उपक्रम मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करतो आणि त्यांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये समजून घेण्यास मदत करतो.

अशी आहे संकल्पना
‘पोलिसकाका’ या उपक्रमातून शाळांमध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी पोलिसांना ‘काका’ म्हणून नियुक्त केले जाते. याचा मुख्य उद्देश मुलांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे आणि त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करणे आहे. तर, मुलींच्या मदतीसाठी महिला पोलिस असून त्यांना ‘दीदी’ म्हटले जाते.

उपक्रमाचा उद्देश

- सुरक्षित वातावरण : शाळांमध्ये सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करणे.
- विश्वासाचे नाते : विद्यार्थ्यांनी पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यास मदत करणे, जेणेकरून त्यांना कोणतीही समस्या असल्यास ते पोलिसांशी बोलू शकतील.
- मार्गदर्शन : लैंगिक शोषण, बालविवाह, सायबर गुन्हे आणि इतर समस्यांवर मुलांना मार्गदर्शन करणे
- समस्या निवारण : मुलांना त्यांच्या समस्या, भीती आणि शंका पोलिसांना सांगता याव्यात यासाठी एक व्यासपीठ तयार करणे.
- जागरूकता : विविध कायद्ये आणि सामाजिक समस्यांविषयी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

विविध शाळा व महाविद्यालयांत पोलिस पथक व पोलिस कर्मचारी यांची नियमित गस्त असते. त्याचप्रमाणे दामिनी पथकही नेमण्यात आले आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
- राजेंद्र बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेवाडी पोलिस ठाणे

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या अनेक व्यक्तिगत समस्या असतात. काही वेळा पालकांशी संवाद न साधता शिक्षकांना आपल्या अडचणी सांगत असतात. एक शिक्षिका या नात्याने आम्हाला अशी अपेक्षा आहे, की पोलिसांकडून किमान दरवर्षी एक दिवस शिक्षक व पोलिस यांचे समन्वय प्रशिक्षण व एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात यावे.
- सुजाता गायकवाड, शिक्षिका

PNE25V36314

Marathi News Esakal
www.esakal.com