विद्यार्थिनींना डिजीटल शिक्षण; मात्र पत्र्याच्या शेडमध्ये !
काळेवाडी, ता. १२ : रहाटणी येथील कै. सुमन बारकू नखाते प्राथमिक कन्या शाळेतील (क्र. ५५) विद्यार्थिनींना महापालिकेकडून एकीकडे आधुनिक डिजीटल स्वरुपात शिक्षण दिले जात आहे. त्याने विद्यार्थिनींची पटसंख्याही वाढली आहे. मात्र, पक्क्या वर्गखोल्या देण्याऐवजी त्यांना चक्क पत्र्याच्या शेडमध्ये बसविले जात असल्याने उन्हाचे चटकेही सहन करावे लागत आहेत.
रहाटणी येथे महापालिकेकडून कै. नारायण सखाराम नढे प्राथमिक मुलांची शाळा (क्र. ५५) व कै. सुमन बारकू नखाते प्राथमिक कन्या शाळा (क्र. ५५) चालविली जाते. परंतु, विद्यार्थी-विद्यार्थिनींना गैरसोयी आणि अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातील मुलींची शाळेत (क्रमांक ५५) पटसंख्या वाढल्याने महानगरपालिका शिक्षण व स्थापत्य विभागाने शाळेच्या जुन्या इमारतीवरच तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड बांधून अतिरिक्त पाच वर्गखोल्या निर्माण केल्या आहेत. त्या ठिकाणी मुलींना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
संपूर्ण वर्गाला एकच पंखा
पत्र्याची शेड व वर्गांच्या रचनेमुळे विद्यार्थिनींना वर्षातील सहा महिने अतिशय तीव्र तापमानात उन्हाचे चटके, गरम व कोंदट वातावरण सहन करावे लागत आहे. हे वर्ग शाळेच्या गच्चीवर चारही बाजूंनी पत्रे ठोकून तयार केले आहेत. पुरेशी हवा मिळण्यासाठी संपूर्ण वर्गासाठी एकच पंखा असल्याने उन्हाळ्यात त्रास सहन करण्यापलीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील जागा अजून महापालिकेकडे न आल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोकळे मैदान उपलब्ध होत नसल्याचेही दिसून आले आहे.
शाळेचे इमारत ही जुनी झाली आहे. तिसऱ्या मजल्यावर अतिरिक्त बांधकामाचा भार सहन करू शकत नाही. त्यामुळे इमारतीच्यावर तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेड बांधून वर्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शाळेच्या समोरील जागा महापालिकेच्या ताब्यात येणे बाकी आहे. त्या जागेची उपलब्धता झाल्यानंतर नवीन इमारत बांधण्यात येईल.
- देवन्ना गट्टूवार, सहशहर अभियंता (स्थापत्य), महापालिका
मी नव्यानेच पदभार स्वीकारला असून इमारतीतील शाळेच्या संदर्भात व इतरही शाळांच्या संदर्भात माहिती घेऊन व त्याविषयी सविस्तर समजून पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- किरणकुमार मोरे, सहाय्यक आयुक्त (प्राथमिक शिक्षण), महापालिका
शाळेतील वर्गखोल्या संदर्भामध्ये विद्यार्थिनी घरी सहसा जास्त काही बोलत नाही. परंतु जर असा त्रास असेल आणि सुविधा नसतील; तर विद्यार्थी संख्या कशी टिकून राहील ? विद्यार्थ्यांच्या हिताकडे शाळा व महानगरपालिका प्रशासन लक्ष द्यावे.
- सुनीता साळुंके, पालक
SVW25A00111
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.