खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट सुरू; मात्र ‘आरटीओ’ला तक्रारींची प्रतीक्षा

खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट सुरू; मात्र ‘आरटीओ’ला तक्रारींची प्रतीक्षा

Published on

काळेवाडी, ता. १६ : ऐन दिवाळीच्या तोंडावर नियमांना सोयीप्रमाणे बगल देत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि ऑपरेटरकडून भाडेवाढीच्या नावाखाली प्रवाशांची उघडपणे सर्रास लूट सुरू झाली आहे. त्याविरोधात तपासणी मोहीम राबविण्याऐवजी प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ) कडून प्रवाशांच्या तक्रारीची वाट पाहिली जात असल्याचे दिसून येत आहे.
काळेवाडी परिसरात जवळपास ६० ते ७० खासगी ट्रॅव्हल्सची कार्यालये आहेत. तेथून दरवर्षी हजारो प्रवासी दिवाळी सुट्यांना आपापल्या गावी जात असतात. सध्या दिवाळी सुट्यांसाठी प्रवाशांकडून बुकींग सुरू झाले आहे. मात्र, त्यामध्ये मुजोर ट्रॅव्हलचालकांकडून प्रवाशांचा खिसा कापला जात आहे. भाडेवाढ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात येईल, असे राज्य परिवहन विभागाने एकीकडे स्पष्ट केले आहे. मात्र, दुसरीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या प्रकरणी कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
विविध खासगी ट्रॅव्हल कंपन्यांकडून त्यांच्या ऑनलाइन पोर्टल आणि ॲपवर ट्रॅव्हल्स चालक व ऑपरेटर यांनी प्रवासी भाडेदर दिलेले असतात. सर्वसामान्य प्रवाशांना ही उघडपणे लूट चाललेली दिसते. मग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाला का दिसत नाही ? असा परखड सवाल प्रवासी करत आहेत.


ट्रॅव्हल्स कंपन्यांची चालाखी
परिवहन विभागाने ट्रॅव्हल्स कंपन्यांना भाडे आकारताना दर ठरवून दिला आहे. त्यापलीकडे त्यांना भाडे आकारता येत नाही. ट्रॅव्हल कंपन्यांकडून स्वतःच्या ऑनलाईन पोर्टलवर कोणत्याही बसचा क्रमांक न टाकता आरक्षित सीटांची उपलब्धता दाखवण्यात येते. बुकिंग झाल्यानंतर प्रवासी बसमध्ये बसण्यापूर्वी तासभर अगोदर बसचा क्रमांक प्रवाशांना कधी एसएमएसद्वारे तर कधी फोनवरुन सांगितला जातो.

दिवाळीची मुलांना १५ दिवस सुटी असते. त्यानिमित्ताने गावाकडे जाणे होते. परंतु खासगी ट्रॅव्हल्सने जाणे परवडत नाही. भाडेवाढ लक्षात घेऊन रेल्वे किंवा एसटी महामंडळाच्या बसने जाणे आम्ही पर्याय निवडतो. आरामदायी बस म्हणून खासगी ट्रॅव्हलकडे बघितले जाते. पण, त्यांचा मुजोरपणा खिशाला चटका देणारा असतो.
- रोहिणी फडे, प्रवासी


पुणे, पिंपरी चिंचवड परिवहन विभाग व ट्रॅव्हल कंपनी मालक आणि चालकांची प्रवासी भाड्याबाबत बैठक झाली असून त्यात जास्त भाडे आकारल्यास कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. प्रवाशांना काही अडचण असल्यास त्यांनी तक्रार दाखल करावी. कारवाई करण्यात येईल.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

नियमित भाडेदर / वाढविलेले दर (प्रति व्यक्तीस)
जळगाव ४०० ते ६००, २२०० ते २४००
बुलढाणा ५०० ते ६००, २३०० ते २५००
अकोला ६०० ते ७००, २२०० ते २३००
नागपूर - ७०० ते ९००, ३७०० ते ५२००
कोल्हापूर- ४०० ते ५००, १००० ते १५००
उदगीर - ४०० ते ५००, १००० ते १५००
इंदोर - ९०० ते १०००, ३५०० ते ५१००


प्रवाशांचे म्हणणे काय ?
- ‘आरटीओ’ला ऑनलाइन बुकींगआधारे कारवाई शक्य
- नियम मोडले जात असल्याचे माहित असूनही कारवाई नाही
- ऑनलाइन व प्रत्यक्ष ट्रॅव्हल्स ऑफिसवर सामान्य दरापेक्षा वाढलेले दर
- ट्रॅव्हलकडून प्रवाशांकडे बस क्रमांक, वेळ व ठिकाणाचे एसएमएस
- सीट व्यतिरिक्त चालकाच्या केबिनमध्येही प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com