काळेवाडी फाटा चौक मृत्यूचा सापळा
संदीप सोनार : सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता. ३० : शहरातील महत्त्वाचा आणि प्रमुख मार्ग असणाऱ्या काळेवाडी फाटा चौकात नेहमीच अपघात होत आहेत. त्यामुळे हा भाग जणू मृत्यूचा सापळा झाला आहे. अशा घटना वारंवार घडत असतानाही वाहतुकीचे नियोजन होत नसल्याची स्थिती आहे. याबाबत नागरिकांनी काही निरीक्षणे मांडत या स्थितीला वाहतूक पोलिस आणि बेशिस्त वाहनचालकांना जबाबदार धरले आहे.
काळेवाडी फाटा चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाचा ढिसाळ कारभार व नियोजनशून्य वाहतूक नियोजन व चौकातील धोकादायक स्थिती वाहतूक कोंडी व बेजबाबदार वाहने चालवत अपघात होण्यासाठी जबाबदार होत आहे. या ठिकाणी चौकात अपुऱ्या सिग्नल व्यवस्था, रस्त्यावर बेशिस्त वाहन उभे राहणे, फेरीवाले आणि अतिक्रमण यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असणे, पर्यायी मार्गांची योग्य माहिती नसणे आणि तात्पुरत्या उपायांवरच भर दिला जाणे यामुळे कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांसह अत्यावश्यक सेवांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चौकात योग्य सिग्नल प्रणाली, लेन मार्किंग, अतिक्रमण हटवणे आणि नियमित वाहतूक नियोजनाची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना न केल्यास अपघातांची संख्या वाढण्याची अजून भीती व्यक्त केली जात आहे. चौकामध्ये दररोज अनुभवास येणारी वाहतूक कोंडी ही केवळ वाहनांची वाढलेली संख्या यामुळे नाही, तर नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली गंभीर समस्या आहे. चौक म्हणजे वाहतुकीचे केंद्रबिंदू. येथेच जर शिस्त, दिशा आणि वेळेचे नियोजन नसेल तर संपूर्ण परिसर ठप्प होणे हे नेहमीच असल्यामुळे उपाययोजना कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस नियोजन आवश्यक असताना प्रशासनाकडून केवळ तात्पुरते उपाय केले जात असल्याचे चित्र दिसते.
नागरिक म्हणतात...
उत्सव, मिरवणुका किंवा राजकीय कार्यक्रमांच्या वेळी काळेवाडी चौकातील परिस्थिती अधिकच बिकट होते. वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय, इंधनाचा अपव्यय, प्रदूषणात वाढ आणि नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही याचा फटका बसतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून सिग्नल समन्वय, सीसीटीव्ही निरीक्षण, स्पष्ट रस्ते चिन्हे आणि नियमित अंमलबजावणी केल्यास परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. त्यासोबतच नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे.
काळेवाडी फाटा चौकातील अपघातांची कारणे
- ‘बीआरटी’ मार्गातून बसचालक नियम न पाळता बस चालवतात
- सिग्नल जम्पिंगचे जवळपास अधिक
- सिग्नल यंत्रणेचा वेळ व इतर गोंधळ
- बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांचा धाक नसणे
- चौकातील अतिक्रमणे, अपुरी पार्किंग व्यवस्था
- चौकातील चुकीचा बांधकाम आराखडा
काळेवाडी फाटा नुकताच वाकड वाहतूक पोलिस हद्दीत गेला आहे. रहाटणी येथे नेहमीच वाहतूक नियम पाळण्याच्या सूचना देण्यात येतात. त्याठिकाणी बेशिस्तांवर कारवाई करण्यात येईल.
- सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

