पाणी टंचाईच्या फेब्रुवारीतच झळा

पाणी टंचाईच्या फेब्रुवारीतच झळा

Published on

पिंपरी, ता.१५ : उन्हाळ्याचा चटका बसू लागल्याबरोबर उपनगरातील काळेवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, थेरगाव आदी भागांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या ‘झळा’ बसू लागल्या आहेत. पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रोजच्या वापरासाठी पाण्याचे खासगी टँकर मागवावे लागत आहेत. तर, पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. या सर्व प्रकारांमागे आर्थिक आणि ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


अर्धा भाग तहानलेला
काळेवाडी : गेल्या काही दिवसांपासून काळेवाडी परिसरातील अनेक सोसायट्या व नागरी वस्ती भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी पुरेसे पाणी साठवणे कठीण जात आहे. विशेषतः सायंकाळी वेळेत पाणीपुरवठा अपुरा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे नेमका तांत्रिक बिघाड, जलवाहिनीमधून गळती किंवा वितरण व्यवस्थेतील असमतोल यापैकी कोणते कारण आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुपारी दोन ते पाच यावेळेत खासगी पाणी टँकर वाहतूक करताना दिसून येत असून यामागे मोठे आर्थिक व राजकीय कारस्थान असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात दिवसाला सरासरी वीस टँकर पाणीपुरवठा केला जात असून सर्व टँकर खासगी आहेत. एका टँकरला जवळपास सातशे ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत.

कमी पाणी पुरवठ्याचा भाग
- ज्योतिबानगर, भारत माता चौक परिसर, तापकीर मळा, नखाते वस्ती, पवनानगर, बीआरटी नवीन रस्त्याकडील भाग, रहाटणी अंतर्गत भाग, विजयनगर, आदर्शनगर, किनारा कॉलनी व संत निरंकारी मंडळ, सत्संग रस्ता, अल्फान्सो स्कूल.

दररोज पाणी नाही. परंतु महापालिका दिवसाआड पाणीपुरवठा देखील कमी दाबाने व अपुरा करत असून बाहेरून पाणी विकत मागवावे लागत आहे. सोसायटीचे देखभाल शुल्क वाढून कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे.
- प्रवीण राऊत, रहिवासी, काळेवाडी
----------

दिवसाआड, तोही कमी दाबाने
पिंपरी ः जुनी सांगवी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाला आहे. दिवसाआड, अनियमित व तेही कमी दाबाने अपुरे पाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, घरगुती वापरासाठी नागरिकांना टँकर किंवा कॅनमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
सांगवी, जुनी सांगवी, ममतानगर, लक्ष्मीनगर, अभिनवनगर, मधुबन, सांगवी गावठाण, जयमालानगर आदी भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी न आल्याने नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरा किंवा अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने घरगुती टाक्या भरत नाहीत.

दुरुस्ती कामांमुळे विलंब
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कधी जलवाहिनी दुरुस्ती, गळती रोखणे व देखभाल कामे सुरू असल्याचे सांगण्यात येते. ‘‘दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल,’’ असे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी विलंब होत आहे. दुरुस्ती कामे हाती घेताना पर्यायी पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे.

सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने विकतच्या पाण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पिण्यासाठी जार, बाटली आदी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- शक्तिगुप्त गायकवाड, जयमालानगर

अपुरा पाणीपुरवठा असताना भरीस भर म्हणून सांगवी परिसरात या ना त्या भागांत वीजपुरवठा खंडित होत आहे. पाणी साठवणूक करण्यासाठी करणे शक्य होत नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो.
- योगेश मोहारे, मधुबन सोसायटी

गेल्या काही दिवसांत मुख्य पाणीपुरवठा वाहिनी दुरुस्ती कामे सुरू होती. त्यामुळे अनियमित पाणीपुरवठा होत होता. सध्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
- साकेत पावरा, अभियंता, पाणीपुरवठा ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
-----------
थेरगावात तहान अपूर्णच
वाकड : थेरगाव भागात दिवसाआड पाणी येते. मात्र, कमी दाबाने येत असल्याने वरच्या मजल्यांवरील घरांना अडचणी येतात. बहुतांश नागरिक नळाला मोटारपंप लावून पाणी उपसतात आणि साठवतात, त्यामुळे इतरांना कमी पाणी मिळते. त्यांची गरज पूर्णपणे भागत नाही. साधारणपणे सकाळी ६ ते ८ यावेळेत पाणी येते. मात्र, त्यातही अनियमितता आढळते.
वाढती लोकसंख्या आणि नवीन बांधकामांमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी पाइपलाइन गळती व तांत्रिक बिघाड यामुळेही पाणीपुरवठा विस्कळित होतो. काही मोठ्या सोसायट्या अद्यापही टँकरवर अवलंबून आहे. टँकरवर महिन्याकाठी भुर्दंड सहन करुन ते आपली तहान भागवत आहेत. भामा आसखेड आणि आंद्रा धरणाचे पाणी येत नाही, तोपर्यंत पाण्याबाबत अशीच स्थिती कायम राहील, असे भीती काही नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

आमच्या भागात पाणी रोज येते. पण, दाब खूपच कमी असतो. वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून आम्हाला मोटारपंप लावावा लागतो. कधी वेळ बदलते, कधी अर्ध्या तासातच पाणी बंद होते. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय करावा.
- ललिता कोंडे, रहिवासी, थेरगाव

कमी दाबाची समस्या गंभीर
- काही ठिकाणी पुरेसे, तर काही भागांत अपुरे पाणी
- कमी दाबाची समस्या गंभीर, मोटारपंप लावणे भाग
- पाण्याच्या अनियमित वेळा, जलवाहिनी गळती
- वारंवार तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीमुळे पुरवठा ठप्प
-------------

पिंपळे गुरवमध्ये टंचाई तीव्र
पिंपळे गुरव : महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अचानक घट झाल्याने पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांत नळांना कमी दाबाने पाणी येत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आहेत. सकाळी मर्यादित वेळेतच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. नागरिकांना पिण्याचे पाणी साठवणे, घरगुती कामे पार पाडणे आणि स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काही ठिकाणी नागरिक नळांना मोटारपंप लावत असल्याने शेवटच्या टोकावरील घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचीही चर्चा आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दररोज पाण्यासाठी होणारी धावपळ, अनियमित वेळापत्रक आणि अपुरा पुरवठा यामुळे तारांबळ उडत आहे.

पाणीपुरवठ्यात अचानक घट
- अनेक भागांत कमी दाबाने पाणी
- काही ठिकाणी पूर्णपणे खंडित पुरवठा
- सकाळी मर्यादित वेळेतच पाणी
- नळांना मोटारी लावल्याने शेवटच्या घरांपर्यंत पाणी अपुरे
- संभाव्य गळती, नियोजनात त्रुटी

आमच्या भागांत पाणी सकाळी फक्त दोन तास येते आणि तेही कमी दाबाने. काही जण मोटारपंप लावतात. त्यामुळे शेवटच्या घरांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. रोज पाण्यासाठी धावपळ करावी लागते. महानगरपालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना करावी.
- राजश्री सणस, स्थानिक गृहिणी
------

असमान पाणीपुरवठा
रावेत : रावेत, आकुर्डी भागांतील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बहुतांश ठिकाणी पाणी दररोज येत असले तरी दाब कमी असतो. सकाळच्या ठराविक वेळेतच पाणी येत असल्याने नागरिकांना त्यानुसार नियोजन करावे लागते. काही रहिवासी नळाला मोटार लावून पाणी ओढतात. त्यामुळे इतरांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होते.

पाणी दिवसाआड येते. काही सोसायट्यांमध्ये पाण्याचा दाब कमी असतो. परिणामी, टॅंकर मागवावे लागतात.
- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा, सोसायटी फेडरेशन

आमच्याकडे काही जण मोटारपंप लावत असल्याने वरच्या मजल्यांवर पाणी नीट पोहोचत नाही. सकाळी ठराविक वेळेतच पाणी येत असल्याने घाई होते. प्रशासनाने समान आणि नियोजित पुरवठ्याकडे लक्ष द्यायला हवे.
- पूनम जाधव, नागरिक

उन्हाळ्यात समस्या तीव्र
- पाणी दिवसाआड येते, पण दाब कमी
- सकाळी- सायंकाळी ठराविक वेळेत पुरवठा
- मोटारपंपाच्या वापरामुळे असमान वितरण
- वरच्या मजल्यांना कमी पाणी
- नियोजन आणि देखभाल गरजेची
-------------

आयटीयन्सला टँकरचा आधार
वाकड : वाकड भागात पाणीपुरवठा नियमित असला, तरी समाधानकारक नाही. नोव्हेंबर-डिसेंबरच्या मध्यावर
त्यांचे दुष्टचक्र सुरू होते. बोअरवेलचे पाणी कमी कमी होत जाते, तसे टँकरच्या बिलांचा आकडा फुगत जातो. त्यात दरवर्षी प्रति टँकर शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होते.
कस्पटे वस्ती येथील पाण्याच्या टाक्यांचे नुकतेच उद्घाटन झाले आणि नळाला पाणीही आले. यंदा चांगला पाऊस झाल्याने बहुतेक सोसायट्यांत बोअरवेल फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चांगल्या चालण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे. सध्या दिवसाआड पाणी मिळते. परंतु अनेक ठिकाणी कमी दाबामुळे वरच्या मजल्यांवर पाणी पोहोचत नाही. तर अनेक सदनिकाधारक देखील मोटारी लावून पाणी उपसत आहेत.
वाढती लोकसंख्या, नव्या टॉवर्सचे बांधकाम, पाणीगळती आणि जुनी जलवाहिन्या या पाणीपुरवठ्यातील प्रमुख अडचणी आहेत. बहुतेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. टँकर व्यावसायिकांना पाणी मिळू शकते, पण आम्हाला नाही. मग महापालिकेने किमान सवलतीच्या दरात टँकर पुरविण्याची व्यवस्था करावी. प्रशासनाने कायमस्वरूपी आणि समान दाबाने पाणी द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष
पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सोसायटीतील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न समजून घ्यावेत, सोसायट्यांची बाजू ऐकून घेत त्या त्या दृष्टीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अंमलबजावणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्या आदेशाला ना महापालिका प्रशासनाने ना जिल्हाधिकारी यांनी कुणीही गांभीर्याने घेतलेले नाही.

बोअरवेल याच तारणहार
- काही भागात पुरेसे, तर काही ठिकाणी अपुरे पाणी
- कमी दाब ही मुख्य समस्या
- सोसायट्यांसाठी बोअरवेलच तारणहार
- बहुतेक सोसायट्यांचे टँकरवर अवलंबित्व
- महिन्याकाठी शेकडो टँकरवर लाखोंचा भुर्दंड
-----------
मोशीवासीयांना दिलासा
मोशी : पुणे - नाशिक महामार्गालगतच्या पूर्वेकडील मोशी गावठाण, शिवाजीवाडी, सस्तेवाडी, आल्हाट वस्ती, डुडुळगाव, वहिलेनगर आदी भागांमध्ये सध्या पाणी पुरेसे, स्वच्छ आणि वेळेत येत आहे. तर महामार्गालगतच्या पश्चिमेकडील बोराटे वस्ती, बनकरवाडी, हजारे वस्ती, संजय गांधीनगर, बोऱ्हाडेवाडी, सावतामाळीनगर आदी भागांतही सध्या पाणी पुरवठा सुरळीत व स्वच्छ असल्याचे नागरिकांनी सांगितले.

- मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४, ६, ९ मध्ये सायं ७ ते रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत
- गंधर्वनगरी परिसरात सध्या पाणी सकाळी वेळेत पाणी येत आहे. मात्र, ते काहीसे कमी दाबाने
- कडक कारवाईच्या भीतीने सध्यातरी नळाला मोटारपंप लावण्यास फाटा

शिवाजीवाडी परिसरात सध्या पाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि स्वच्छ येत आहे. मात्र, कदाचित मोशीतील यात्रेमुळे हा पाणीपुरवठा सुरळीत असेल, तर मात्र सांगता येत नाही. त्यामुळे यात्रा झाल्यानंतरच पुन्हा एकदा या पाण्याचा आढावा घ्यावा लागेल.
- अमित गायकवाड, शिवाजीवाडी, मोशी
------------
पाणी साठवून ठेवणे भाग
चिंचवड स्टेशन : जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या एका बाजूला एक दिवस, तर दुसऱ्या बाजूला एक दिवस पाणीपुरवठा केला जातो. पहाडे साडेचारपासून दुपारी बारापर्यंत पाणी सुरू असते. या भागांतील बैठी घरे, चाळी आणि सोसायट्यांमध्ये पाणी साठवून ठेवले जाते.
मोहननगर परिसरात गायवासरू चौकाच्या डाव्या बाजूला एक दिवस तर उजव्या बाजूला एक दिवस पाणीपुरवठा होतो. पहाटे साडेपाच ते साडेअकरापर्यंत उच्च दाबाने पाणी असते. त्यानंतर पाण्याचा वेग कमी पाण्याच्या दिवशी येथील रहिवासी पाणी भरून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तेच वापरतात.

पाणी येते त्यादिवशी आम्ही टाक्या, पिंप, बादल्या सर्व भरून ठेवतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला अडचण येत नाही. गेली अनेक वर्षे एक दिवसाआड पाणी येत आहे. दिवसाआड सहा ते सात तास पाणी सोडण्यापेक्षा महापालिकेने रोज किमान अडीच ते तीन तास पाणी सोडावे.
- ममता शिंदे, स्थानिक रहिवासी
-----------
दोन दशकांची समस्या, मात्र उपाय नाही
भोसरी : चक्रपाणी वसाहतीतील अक्षयनगर, गणेशनगर, विश्वकर्मा कॉलनी आदी भागांतील सुमारे दीडशे घरांना कमी दाबाने आणि तोही कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे. पिण्याचे पाणीही विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील अक्षयनगर, गणेशनगर, विश्वकर्मा कॉलनी हा भाग पाणी पुरवठा यंत्रणेत शेवटच्या टप्प्यात येतो. त्यामुळे या भागात मुळातच कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यातच पहिल्या टप्प्यातील नागरिकांनी लावलेल्या पाण्याच्या मोटारी बंद झाल्यावरच शेवटच्या टप्प्यातील नागरिकांना पाणी पुरवठा होतो. ही समस्या गेल्या वीस वर्षांपासून नागरिकांना भेडसावत आहे. ‘सकाळ’ने या विषयी वारंवार आवाज उठविल्याने महापालिकेने येथील जलवाहिन्या आणि पाण्याच्या वेळा बदलून पाणी पुरवठा सुरळीत केला होता. मात्र, आता पुन्हा या भागातील पाणी पुरवठ्यामध्ये समस्या उद्‍भवल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच घरगुती वापरासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने घरातील कामे कशी करायची ? असा संतप्त सवाल शशिकांत देसाई, छाया जगधने, दत्ताभाऊ जगधने, सुमन देसाई आदी नागरिकांनी केला आहे.

चक्रपाणी वसाहतीत पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे दुपारी बारा वाजता पाणी सोडले जाते. मात्र, आमच्या भागात संध्याकाळी चार ते पाच या दरम्यान पाणी येते. साडेपाच वाजता पाणी बंद होते. त्यामुळे पिण्याचे पाणीही पुरेसे भरता येत नाही.
- सुरेखा सपकाळ, नागरिक, अक्षयनगर, चक्रपाणी वसाहत

पिण्यासाठी पाणी पुरेसे मिळत नसल्याने शेजाऱ्यांकडून पाणी घ्यावे लागते. बऱ्याचवेळा पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने घरगुती कामे करण्यास अडचणी येत आहेत.
- सिंधू सिंग, नागरिक, अक्षयनगर, चक्रपाणी वसाहत
---------

रुपीनगर, तळवडे भागांत दुर्भिक्ष
निगडी : रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर, तळवडे, ज्योतिबानगर भागांमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. रुपीनगरमधील संगम, हनुमान, राजमाता, अष्टविनायक, विजयानंद या सोसायट्या पाणी समस्येला सामोऱ्या जात आहेत. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, कमी कालावधी तसेच कमी दाबाने पाणी येत आहे. या परिसरात झपाट्याने वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याच्या वाढली आहे. त्याचा विशेषतः महिला वर्गांना रोज सामना करावा लागत आहे. अनेकवेळा संपूर्ण कुटुंबाचे वेळापत्रकच कोलमडत आहे. पाणीपुरवठा अपुरा होत असल्यामुळे सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड सोसून पाणी टँकर मागविण्याची वेळ येत आहे. वाढत्या मागणीमुळे टँकरचालक दर वाढवत आहेत. पुरेशा दाबाअभावी उंच भागांमध्ये फार कमी वेळ पाणी उपलब्ध होते, अशी नागरिकांची तक्रार आहे. टाकीत योग्य पाण्याची पातळी न आल्यामुळे पाण्याचा दाब कमी येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून दिली जात आहे. ज्योतिबानगर औद्योगिक पट्ट्यात तर संपूर्ण लघुउद्योग हे बोअरवेलच्या पाण्याचा वापर करतात, तर अनेक लघुउद्योजकांनी पिण्याच्या पाणीपुरवठाचे कंत्राटच खासगी माणसांना दिले आहे.


मागील दोन महिन्यांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारही केली आहे. पण समाधानकारक उत्तर दिले जात नाही. तांत्रिक अडचणी समोर केल्या जातात. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्याची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही.
- वंदना घाडगे, स्थानिक नागरिक

मर्यादित जलस्रोत, वाढती लोकसंख्या आणि वाढती मागणी यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते. त्याचबरोबर जे पाणी उपलब्ध करून दिले जाते. ते नागरिकांनी योग्य, मर्यादित व जबाबदारीने वापरण्यास शिकणे हेही तितकेच मोठे आव्हान आहे.
- राजेश जाधव, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com