काळेवाडी, रहाटणीचे नागरिक हवालदील
संदिप सोनार
सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी ता. १५ : काळेवाडी व रहाटणी परिसरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे तसेच योग्य नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काळेवाडी परिसरात काही दिवसापासून पाणीपुरवठा यंत्रणा चालवण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाणी साठवणे व पुढे वितरण करणे अडचणीचे ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काळेवाडी परिसरातील तापकीर नगर, साई मल्हार कॉलनी, ज्योतिबा नगर, विठ्ठल रुक्मिणी नगर तसेच तापकीर मळा आदी भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
रस्त्याच्या विरुद्ध बाजूला विजय नगर या मोठ्या परिसरात मात्र नागरिकांना खाजगी टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असल्याचे चित्र आहे. विजय नगर, आदर्श नगर, किनारा कॉलनी व संत निरंकारी मंडळ, सत्संग रस्ता, अल्फान्सो स्कूल व बीआरटीएस रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या मोठ्या परिसरात मात्र पाणी कमी दाबाने व अपूर्ण पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
एका टँकरला जवळपास सातशे ते बाराशे रुपये मोजावे लागतात. काळेवाडी हा परिसर दाट लोकवस्ती व आजूबाजूला मोठ्या सोसायटी असणारा भाग असून या ठिकाणी पिंपरी बाजारपेठ असल्याने मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग राहत असल्याने या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याने दैनंदिन जीवन चक्र यामुळे अडचणीत आले असून महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
---
परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने व अपूर्ण पाणी पुरवठ्यामुळे सध्या खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरातील कामे कमी पाणी पुरवठ्यामुळे पूर्ण होत नसून दैनंदिन जीवनात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- सुनीता जाधव, काळेवाडी
व्यवसायासाठी लागणारे पाणी कमी असून कमी दाबाने येते. अनेक समस्या असताना पाण्याची मुख्य समस्या ही अडचणीची ठरत आहे व व्यवसायावर परिणाम होत आहे.
- संकेत शिंदे, व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

