तुटलेले केबल नागरिकांसाठी ठरताय ‘गळफास’

तुटलेले केबल नागरिकांसाठी ठरताय ‘गळफास’
Published on

काळेवाडी, ता. २५ : काळेवाडी आणि रहाटणी परिसरात पदपथांवर तसेच रस्त्यांवर तुटलेल्या केबल्सचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
विविध खासगी कंपन्यांच्या इंटरनेट व इतर केबल्सची योग्य देखभाल न झाल्याने तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाने कारवाईदरम्यान काढलेल्या केबल्स त्याच ठिकाणी टाकून दिल्यामुळे त्या पदपथांवर आणि रस्त्यांच्या मधोमध विखुरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालताना अडथळा निर्माण होत असून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याने या केबल्स स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. काही ठिकाणी दुचाकीस्वार या केबल्समध्ये अडकून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, केबल दुरुस्तीची कामे अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केबल ऑपरेटर तसेच संबंधित विभागाकडून नियमित देखभाल न केल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तुटलेल्या केबल्सची दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियमावली आणि प्रभावी देखरेख व्यवस्था लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या परिसरात आहे तुटलेले केबल
-कुणाल गार्डन नखाते वस्ती रस्ता
-तापकीर चौक ते अंतर्गत भाग
-रहाटणी फाटा ते गोडांबे चौक, रहाटणी गाव चौक
-विजयनगर मधील बीआरटी रस्ता
-पिंपरीगाव व पिंपरी कॅम्प जोडणारा रस्ता


पदपथावरील तुटलेल्या केबल्समुळे गळफास लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याची जबाबदारी कोण घेणार? महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
- दिनेश पाटील, नागरिक

परिसरात शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच महिला सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात. केबल तुटलेल्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
- सुरेखा वाणी, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com