

काळेवाडी, ता. १६ : काळेवाडी परिसरातून जाणाऱ्या बीआरटी मार्गिकेचा खासगी वाहन चालकांकडून ‘शॉर्टकट’ म्हणून वापर होत असल्याने मार्गिकेत घुसखोरी वाढत आहे. त्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. याशिवाय, अपघाताचा धोका वाढून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर परिसरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी जलद आणि सुरक्षित व्हावी यादृष्टीने स्वतंत्र बीआरटी मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची बेकायदेशीर रहदारी सुरू आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांकडून बीआरटी मार्गाचा ‘शॉर्टकट’ म्हणून वापर केला जात आहे.
समस्या अन् उपाय
- बीआरटी मार्गिकेत एमपी बस चालकांचीही बस चालवताना कसरत
- तापकीर चौक ते छत्रपती चौकापर्यंत बीआरटी मार्गिकेत नियमांची पायमल्ली, वारंवार किरकोळ व मोठे अपघात
- अचानक समोर येणाऱ्या वाहनांमुळे बस चालकांना ब्रेक लावणे कठीण, प्रवाशांनाही त्रास
- वाहतूक पोलिसांच्या नियमित कारवाईचा अभाव, वाहन चालकांच्या मुजोरीत वाढ
- कॅमेरे व बॅरिकेड्स तातडीने सुरू करणे, नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई, वाहतूक पोलिसांची नियमित गस्त वाढविणे आवश्यक
बीआरटी मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी आहे. मात्र, खासगी वाहन चालक नियम तोडून प्रवेश करत असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- सतीश गजरे, नागरिक
चौक व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवून मार्ग सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस प्रयत्न करत असतात. अशा वेळी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे. बीआरटी मार्ग बससाठी असून त्यातून जाऊ नये. दांडात्मक कारवाई केली जाईल.
- सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, सांगवी