

काळेवाडी, ता. २६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांसह विविध आरोग्य विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आवश्यक साधनसामग्री, स्वच्छ कार्यस्थळ, आर्थिक तरतूद आणि पायाभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, डास नियंत्रण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य तपासणी यांसह विविध कामे केली जातात. मात्र ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यास त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.
महापालिका नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा दावा करत असताना त्या सुविधा प्रत्यक्षात पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक निधी, साधने आणि पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व क्षेत्रीय कार्यालये व आरोग्य विभागांची नियमित पाहणी करावी. तेथील त्रुटी दूर करून कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
काय आहेत समस्या
- कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ कपडे, हातामोजे, मास्क, सुरक्षा जाकीट, बूट उपलब्ध नाही
- पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याची तक्रार
- आरोग्य विभागासाठी आवश्यक साहित्य, साधनसामग्रीचा अभाव
- कार्यालयीन पायाभूत सुविधांची कमतरता
- खराब किंवा अपुऱ्या आसनव्यवस्था
- पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, चिखल व अस्वच्छता
या उपाययोजनांची गरज
- सर्व आरोग्य कार्यालयांची सुविधा तपासणी करावी
- स्वच्छ पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी
-आवश्यक आरोग्य व सुरक्षा साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे
- कार्यालयांची दुरुस्ती व पायाभूत सुविधांचे काम करावे
- आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा-सुविधांशी संबंधित प्रलंबित मागण्यांचा आढावा घ्यावा
- महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध कराव्यात
- आवश्यक वाहने, उपकरणे व औषध फवारणीची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावीत
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करावी
आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पालिकेच्या नियमानुसार दिले जातात काही कर्मचारी हे कचरा वेचक व इतर ठेकेदाराच्या अंतर्गत काम करतात त्यांना ठेकेदारांनी सुरक्षा साहित्य व साधने पुरवणे आवश्यक असून त्या संदर्भात सूचना दिल्या जातील.
- सुरज कुंभार, आरोग्य निरीक्षक, क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
अनेक कर्मचारी पहाटे कचरा संकलन व वर्गीकरणाचे काम करताना थेट कचऱ्यात हात घालून काम करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेने कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत.
- पराग जाधव, नागरिक
कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक महिला आहेत. कचऱ्याच्या थेट संपर्कामुळे त्यांच्या आरोग्यावर तसेच घरातील स्वच्छतेवर आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
- वंदना पाटील, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.