

तळेगाव दाभाडे, ता. २८ : अवघ्या काही दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली असताना तळेगाव दाभाडे आणि परिसरात मशिदी तसेच ईदगाहवर नमाज अदा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुस्लिम ट्रस्टतर्फे आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून सर्व जाती-धर्मीयांनी गुढीपाडवा आणि ईद आपुलकीने साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी (ता. २७) शब-ए-कद्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. याच पवित्र रात्री कुरआन अवतरले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे. त्याच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज अदा केली आणि मानवतेच्या मार्गाने चालण्याची प्रार्थना केली. तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मशिदीमध्ये मौलाना शाहीद सिकीलकर तर गावभागातील जमा मशिदीमध्ये मौलाना सिकंदर -ए- आजम यांनी सार्वजनिक दुआ घेतली.
ईदच्या दिवशी संभाव्य गर्दी पाहता स्टेशन मशीद येथे नमाज दोन टप्प्यांत होणार आहे. पहिली सकाळी ८.१५ वाजता आणि दुसरी नऊ वाजता अदा केली जाईल, अशी माहिती मुख्य विश्वस्त अय्युब सिकीलकर यांनी दिली. नागरिकांच्या सोयीसाठी श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या प्रांगणात वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
गावभागातील ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज अदा होणार असल्याचे विश्वस्त रशीद सिकीलकर यांनी सांगितले. ईद संयोजन समिती प्रमुख नदीम शेख यांनी उपस्थितांना रमजान ईद साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी नमाज आणि धार्मिक विधींच्या आयोजनात सहकार्य करावे, नागरिकांनी शिस्तबद्धरीत्या वर्तन करावे आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. ईद ३१ मार्च किंवा एक एप्रिलला साजरी होण्याची शक्यता असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.