‘स्थानिक’च्या निवडणुकांबाबत कार्यक्रमाची प्रतीक्षा

‘स्थानिक’च्या निवडणुकांबाबत कार्यक्रमाची प्रतीक्षा

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ३० : मावळातील दोन नगर परिषदा, दोन नगर पंचायती, तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या राजकीय हालचाली काही प्रमाणात सुरू आहेत. मात्र, प्रभाग रचना आणि आरक्षण पद्धतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव, वडगाव, लोणावळा, कामशेत, इंदोरीसह तिन्ही मावळातील इच्छुकांनी मतदारसंघांमध्ये सक्रियता वाढवली आहे. स्थानिक विकास कामांचा आढावा, जनतेसोबत संवाद, विविध उपक्रमांच्या माध्यमातून उपस्थिती दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आरक्षण बदलल्यास सध्याची मोर्चेबांधणी आणि केलेली तयारी वाया जाण्याची भीती सर्वांना जाणवते आहे.
मागील निवडणुकीत महिला, मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती- जमातींसाठी आरक्षण लागू होते. तेथे येत्या निवडणुकीला काय स्थिती असेल, याची चर्चा आहे. तर, प्रभागांचे आरक्षण बदलू शकते, अशीही राजकीय चर्चा आहे. यामुळे एका प्रभागातून सातत्याने निवडणूक लढवणारे इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन चेहरे पुढे येऊ शकतात. यामुळे सत्ताधारी गट आणि विरोधक दोघांच्याही गणितांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर, याबाबतचे निर्णय कधी होतात याची माहिती मिळवण्यासाठी काही जणांच्या नजरा मुंबईकडे लागून आहेत.

सर्वच पक्ष पदाधिकाऱ्यांची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार सध्या गट बांधणी, समाजकार्याच्या माध्यमातून संधी शोधत आहेत. काहींनी सोशल मीडियावरून जनसंपर्क वाढवला आहे. मात्र राज्य सरकारकडून प्रभाग रचना, आरक्षण व निवडणूक कार्यक्रमाबाबत अजूनही ठोस निर्णय न आल्यामुळे चलबिचल वाढली आहे.

प्रक्रिया वेळेत होण्याची अपेक्षा
निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी निवडणूक आयोग व राज्य शासनाने वेळेत प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. मतदार याद्यांचे पुनरावलोकन, नकाशांनुसार प्रभाग ठरवणे, आणि आरक्षण निश्चित करणे या प्रक्रियेत विलंब झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गोंधळात जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com