धबधबे, हिरवाई अन् धुक्याची चादर...
तळेगाव दाभाडे, ता. ७ : सध्या पावसाळ्याने निसर्ग बहरला असून परिसरातील पर्यटन स्थळे सौंदर्याच्या शिखरावर पोहोचली आहेत. मावळातील डोंगर, धबधबे, हिरवाई आणि धुक्याची चादर या सर्व गोष्टींनी सजलेले हे स्थळ पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते आहे. एक दिवसाच्या सहलीसाठी आंदर मावळ हे ठिकाण पसंतीचे ठरत आहे. पर्यकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटावा. मात्र, धोक्याच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकवे गावापासून आंदर मावळ परिसर सुरू होतो. तेथे डोंगराळ व दुर्गम असा भाग आहे. या भागात १९२२ मध्ये बांधलेले टाटांचे ठोकळवाडी धरण असून पंचवीस किलोमीटरपर्यंत जलाशय आहे. धरणाच्या वेढ्यावर सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर चाळीस गावे व वाड्या वस्त्या आहेत. वडेश्वर, खांडी तर उजव्या बाजूला टाकवे, भोयरे, सावळा असे धरणाच्या दोन्ही बाजूंनी जाणारे रस्ते आहेत. दोन्ही बाजूंच्या डोंगरामध्ये जलाशय आहे.
कोकणाचे विहंगम दृश्य
चढ-उताराची नागमोडी वाट, हिरवीगार शेती, डोंगरावरून वाहणारे पाण्याचे पाट, अशी दृश्ये नजरेत सामावून घेत आपण आंदर मावळचे शेवटचे टोक असलेल्या खांडी गावात कधी पोहोचतो तेच समजत नाही. खांडी येथे टाटा पॉवर कंपनीचे अठरा क्रमांकाचे गेट आहे. वीजनिर्मितीसाठी ठोकळवाडी धरणाचे पाणी येथून खाली सोडले जाते. मात्र, तेथे जाण्यास मनाई आहे. त्याच्या बाजूच्या पठारावर गेल्यास कोकणचे विहंगम दृश्य नजरेस पडते. धुक्याच्या पाठशिवणीचा खेळही येथे पाहवयास मिळतो.
पर्यटकांच्या आवडीची ठिकाणे :
१. डांभेवाडी, मोरसवाडी, वडेश्वर, नागाथली, कुसमवली, बोरवली येथील धबधबे
२. बोरवली येथील अंजनी माता मंदिर, हिरवीगार शेती, निळशी येथील ठोकळवाडी धरण, खांडीजवळील पठारावरून कोकणचे विहंगम दृश्य
ही खबरदारी घ्या…
- पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा
- वाहने काळजीपूर्वक चालवावीत
- प्रवासापूर्वी वाहनांची देखभाल-दुरूस्ती करून घ्यावी
- धबधब्यांपर्यंतची वाट निसरडी असल्याने जवळ जाऊ नका
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्रमांक
- वडगाव पोलिस : ०२११४-२३५३३३
- कामशेत पोलिस : ०२११४-२६२४४०
- वन्यजीव रक्षक मावळ : ९८२२५५००४
- शिवदुर्ग मित्र लोणावळा : ९८२२५००८८४
पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाणे टाळावे. नको ते धाडस करून आपला जीव धोक्यात घालू नये. बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटनास गेल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, वडगाव मावळ