तळेगावात जादूटोण्याचा प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल
तळेगाव दाभाडे, ता. १ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरासमोर एका महिलेने जादूटोणा केल्याचा प्रकार घडला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै) रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास शनिवार पेठ येथे घडली. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गरुड यांच्या घरासमोर पार्किंग परिसरात सदर महिलेने एका कागदात लिंबू आणि त्यावर हळद-कुंकू टाकून जादूटोणा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आहे,’’ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत गरूड म्हणाले, ‘‘मी समाजासाठी व इनाम जमीन प्रकरणातील जुनी प्रकरणे पुन्हा सुरू केली आहेत. त्यामुळे रागातून माझ्या राहत्या घरासमोर हा प्रकार करण्यात आला. मला पोलीस संरक्षण मिळावे.’’