जोडरस्त्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
तळेगाव दाभाडे, ता. ३ : नवलाख उंब्रे ते बधलवाडीदरम्यान एमआयडीसी फेज १ ते फेज २ जोड रस्ता तातडीने पूर्ण व्हावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकजूट केली आहे. या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज व विनंत्या करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही.
या भागात दररोज सकाळ, सायंकाळ दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे ग्रामस्थ व कंपन्यांतील कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रुग्णवाहिका, शाळेची वाहने आणि कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. आजवर या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी प्राण गमावले आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
या पार्श्वभूमीवर, तळेगाव दाभाडे एमआयडीसी बंद आणि उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला आहे. यासाठी नियोजनाची बैठक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्री भैरवनाथ मंदिर, नवलाख उंब्रे येथे होणार आहे. बैठकीला नवलाख उंब्रे, जाधववाडी, मिंडेवाडी, कदमवाडी, बधलवाडी, आंबी व मंगरूळ येथील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शांताराम कदम आणि नागरिकांनी केले आहे.