भूसंपादनाच्या अतिरिक्त परताव्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट
तळेगाव दाभाडे, ता. १९ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. पण, शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित राहिल्या. त्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भरत मोरे, गुलाब तिकोने, भाऊ पिंपळे, अनिल आंबेकर, दशरथ तिकोने, गणपत केदारी, विलास दळवी, साईनाथ मांडेकर, सोनू खाडे, दिनेश वाळुंजकर, तानाजी मस्के यांच्यासह अन्य गावांतील शेतकरी उपस्थित होते.
सुमारे तीस वर्षांपूर्वी महामार्गासाठी सुमारे ६५ गावे संपादित झाली. त्यावेळी दिलेला मोबदला अपुरा असल्याने शेतकऱ्यांना पर्यायी जमीन घेणे किंवा घरे उभारणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक जण भूमिहीन झाले. याशिवाय आयआरबी कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला. या बाबत कामशेत येथे नुकताच शेतकरी मेळावा घेण्यात आला होता.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
- संपादित शेतकऱ्यांच्या मुलांना आयआरबी कंपनीत नोकरी द्यावी
- भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मुंबई-पुणे टोल फ्री पास द्यावेत
- डंपिंगसाठी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात
- द्रुतगती मार्गामुळे विभागलेल्या शेतीसाठी रस्त्यांची सोय करावी.
- संपादित जमिनींचा अतिरिक्त मोबदला आजच्या बाजारभावानुसार द्यावा
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा महिनाभरात मोठे आंदोलन केले जाईल.
- भरत मोरे, अध्यक्ष, कृती समिती
गणपती उत्सव झाल्यानंतर आयआरबी व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत तोडगा काढण्यात येईल.
- विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ