पिंपरी-चिंचवड
वडगाव-सांगवी रस्त्यावर बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
तळेगाव दाभाडे, ता. ६ ः वडगाव-सांगवी रस्त्यावर खापऱ्या ओढ्याजवळ बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी दिनेश पगडे यांची खापऱ्या ओढ्याजवळ शेती आहे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला पळून नेले. ही घटना समजताच पगडे यांनी वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल प्रकाश शिंदे, मल्लिनाथ हिरेमठ यांनी भेट देऊन पाहणी केली. नखांच्या ठस्यांची तपासणी केली असता बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरात गवत वाढले आहे. ते गवत कापून प्रकाशाची व्यवस्था करावी. तसेच बिबट्या दिसल्यास वन विभागाला संपर्क साधावा. असे आवाहन वन विभागाने केले आहे.