‘लोहगड किल्ला ‘शिवतीर्थ’ व्हावा’
तळेगाव दाभाडे, ता. ७ : ऐतिहासिक लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गडावरील बुरूज, तटबंदी, दरवाजे, लक्ष्मी कोठी, विंचू कडा आणि सोळा कोन तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. गडाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला असून, लोहगड किल्ला ‘शिवतीर्थ’ व्हावा, अशी मागणी लोहगड-विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली आहे.
गडावरील काही दरवाजे पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक पद्धतीने नव्याने उभारले आहेत. रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. पण गडाचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. दारूबंदी, अमली पदार्थांवर नियंत्रण, वृक्षतोड थांबवणे यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गडावर पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्थाही तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.