सण-उत्सव काळात खबरदारी घ्या
तळेगाव दाभाडे, ता. १९ : दिवाळी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गावाबाहेर जातात. या काळात चोरी, घरफोडीच्या घटना घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.
बाहेरगावी जाताना शेजारी, तसेच पहारेकरी यांना कळवावे. घराच्या दरवाज्यास चांगल्या दर्जाचे कुलूप व कडी, कोयंडे लावावेत. व्हरांडा-अंगणातील बल्ब सुरू ठेवावा, घराभोवती चांगल्या प्रतीचे नाइट व्हिजन सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन पेालिसांनी केले आहे.
यासह घरातील सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू रोख रकमेसह बँकेत किंवा लॉकरमध्ये ठेवाव्यात. एखादी शंकास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपल्या घराचे शेजारी, गावातील ग्रामसुरक्षा दल, तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
संपर्कासाठी क्रमांक
‘‘अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा कामशेत पोलिस ठाण्याच्या ०२११४-२८६५४० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,’’ असे आवाहन करण्यात आले आहे.