मावळच्या तहसीलदार पदासाठी जोरदार रस्सीखेच
तळेगाव दाभाडे, ता. १४ : उत्खनन गैरव्यवहारप्रकरणी दहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे मावळ तहसीलदारांचे पद रिक्त झाले असून, या महत्त्वाच्या खुर्चीसाठी इच्छुक अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.
या रिक्त पदासाठी काही इच्छुक तहसीलदारांनी सध्याच्या अधिवेशनाच्या काळात विविध पक्षांचे आमदार, मंत्री तसेच पक्षातील नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत जमिनींचे दर गगनाला भिडले असून, खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे मावळ तालुक्याला महसूल खात्यात कमालीचे महत्त्व आहे. विशेषत: रस्ता प्रकरणे, कुळकायदा, वतन व आदिवासी जमिनींच्या केसेस, तसेच क्रशर, खाणी आणि विटभट्ट्यांमधून मिळणारी रॉयल्टी या सर्व बाबींमध्ये तहसीलदारांचा अहवाल आणि निर्णय अत्यंत महत्त्वाचा असतो. तालुक्यात अशा प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या खुर्चीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवीन तहसीलदार कोण?
मावळ तहसीलदार पदासाठी यापूर्वीही नेहमीच चढाओढ पाहायला मिळाली आहे. तर, कार्यकाळ संपण्यापूर्वी बदली झाल्यानंतर काही तहसीलदारांनी ‘मॅट’मध्ये दाद मागून पुन्हा पदाचा ताबा मिळवल्याची उदाहरणेदेखील तालुक्यात आहेत. दरम्यान, देशमुख यांच्या निलंबनानंतर या पदासाठी दोन महिला तहसीलदार आणि तीन पुरुष तहसीलदार असे एकूण पाच इच्छुक ‘फिल्डिंग’ लावत असल्याची चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अखेर या महत्त्वाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिफारसपत्राला महत्त्व
मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे, तर आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना बारणे यांच्या शिफारसपत्राला विशेष महत्त्व होते. मात्र, आता पालकमंत्री अजित पवार असल्याने शेळके यांच्या शिफारसपत्राला अधिक वजन असल्याची चर्चा आहे. या शिवाय महसूल खाते भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असल्याने राजकीय समन्वय साधणाऱ्याच उमेदवाराची नियुक्ती होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

