खर्चिक निवडणुकीमुळे उमेदवार कर्जाखाली
विजय सुराणा : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. १० : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडणुकीत काही उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या फटका दिल्याचे चित्र समोर आले आहे. विजय आणि पराजय वेगळे असले, तरी निवडणुकीनंतर आता या दोन्ही उमेदवारांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याची चर्चा आहे. काही उमेदवारांनी कोट्यवधींचा खर्च केल्याची मावळात चर्चा आहे. तालुक्यात सुमारे शंभर कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
निवडणूक प्रचारासाठी वाहनव्यवस्था, कार्यकर्त्यांची फौज, सभा-मेळावे, बॅनर-पोस्टर, सोशल मीडियावरील जाहिराती, मतदार संपर्क आणि विविध नियोजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. या वाढत्या खर्चामुळे काही उमेदवारांना लाखो रुपयांचे कर्ज काढावे लागले आहे. काहींनी वैयक्तिक बचत खर्च केली, तर काहींनी खासगी सावकार, पतसंस्था, खासगी स्रोतांकडून कर्ज उचलले आहे. विशेष म्हणजे, विजय मिळवलेल्या उमेदवारांनाही तत्काळ आर्थिक उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्जफेडीची चिंता सतावत आहे. तर, पराभूत उमेदवारांना पराभवाबरोबरच कर्जाचे ओझे सहन करावे लागत आहे. त्यामुळे ‘जिंकले तरी अडचण, हरले तरी अडचण’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवसेंदिवस खर्चिक होत आहेत. प्रतिष्ठा आणि स्पर्धेमुळे खर्चाचे प्रमाण वाढले असून निवडणुका आता कोट्यवधींच्या घरात पोहोचल्या आहेत. लोकशाहीसाठी हे चित्र धोकादायक आहे.’’
तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या दोन्ही नगर परिषद व वडगाव नगर पंचायत निवडणुकांमध्येही मोठी उलाढाल झाल्याची चर्चा आहे. त्या निवडणुकांतील अनेक नगरसेवक आणि उमेदवार आजही कर्जफेडीच्या विवंचनेत आहेत. मतदारांमधूनही वाढत्या खर्चाबाबत नाराजी व्यक्त होत असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि खर्चावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भविष्यात उमेदवार मिळणे कठीण
मावळात निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असल्याने आगामी काळात इच्छुक उमेदवारांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका होण्याची भीती आहे. अन्यथा उमेदवार कर्जाच्या विळख्यात अडकत जाऊन त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवर होण्याची भीती आहे.
PNE26V94545
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

