मावळ खरेदी-विक्री संघात
नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू

मावळ खरेदी-विक्री संघात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २४ : कामशेत येथील मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, सभापती शिवाजी असवले आणि उपसभापती अमोल भोईरकर यांनी पदांचे राजीनामे सादर केले आहेत. संघाच्या सभेत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी अधिकृतरीत्या राजीनामे दिल्याने नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मार्च २०२४ मध्ये संघाची निवडणूक झाली होती. त्यावेळी असवले यांची सभापतीपदी तर भोईरकर यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली होती. निवडीनंतर सर्व सदस्यांना कामाची समान संधी मिळावी, या उद्देशाने पदांचा कार्यकाळ वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठरलेल्या कालावधीनंतर नियोजनपूर्वक राजीनामे देण्याचे ठरले होते.
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम स्थानिक सहकार क्षेत्रावरही झाला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलली. पक्षातील मोठा गट वेगळा झाल्याने पदांच्या फेरबदलाचे ठरलेले वेळापत्रक प्रभावीपणे राबवता आले नाही. परिणामी इच्छुक सदस्यांना संधी मिळण्यास विलंब झाला.
अशा परिस्थितीत झालेल्या सभेत सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिल्याने इच्छुक सदस्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. तालुक्यातील सहकार क्षेत्र राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. खरेदी-विक्री संघाचा शेतकरी व व्यापारी वर्गाशी थेट संबंध असल्याने नेतृत्वातील बदलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संघातील सत्ता समीकरणे राजकीय पाठबळ आणि सहकार क्षेत्रातील समन्वय यांचा विचार करून नव्या सभापती व उपसभापतीची निवड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजीनाम्यानंतरची औपचारिक प्रक्रिया, निवडणुकीचे वेळापत्रक आणि उमेदवारांची अंतिम निवड स्पष्ट झाल्यानंतर नेतृत्वाचे पुढील चित्र समोर येईल. नेतृत्वबदलाच्या निमित्ताने संघात नव्या व युवा नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत सहकार क्षेत्रात तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढल्याने त्यांना जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com