नारोजी बापुजी देशपांडे समाधी परिसराची दुरवस्था

नारोजी बापुजी देशपांडे समाधी परिसराची दुरवस्था

Published on

तळेगाव दाभाडे, ता. १ : छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेली वीर नारोजी बापुजी देशपांडे यांची समाधी वडगाव येथे ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखली जाते. मात्र, सध्या या समाधी परिसराची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वडगावातील हे ठिकाण पूर्वीपासून ‘घुमटेश्वर मंदिर’ म्हणून परिचित आहे. इतिहास संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, मुघलांविरोधातील लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या नारोजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराजांनी येथे समाधी उभारली. त्यामुळे या स्थळाला ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक आणि शिवप्रेमी या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे भेट देतात; मात्र समाधीपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.
या समाधिस्थळाला बाबासाहेब पुरंदरे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे तसेच पुण्यातील देशपांडे कुटुंबीयांनीही भेट दिली आहे.
मात्र, सध्या समाधी परिसरात साफसफाईचा अभाव, वाढलेली झाडी, तुटलेली संरचना तसेच देखभाली अभावी निर्माण झालेली अस्वच्छता यामुळे या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिसरात माहितीफलक, संरक्षणभिंत आणि मूलभूत सुविधा नसल्याने वारशाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. इतिहासाचा वारसा असलेल्या या समाधिस्थळाचे जतन व संवर्धन करून योग्य रस्ता, नियमित साफसफाई आणि संरक्षणाची ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शिवप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थळाचा इतिहास
सूरत शहरातून परतताना मुघलांनी महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी लुटीची संपत्ती घोड्यांवर असल्याने थेट युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी नारोजी देशपांडे यांना पुण्यातून दोन हजार सैन्य घेऊन मोगलांना रोखण्याचे आदेश दिले. तळेगाव-वडगाव परिसरात तीन दिवस तुंबळ युद्ध झाले आणि त्यात नारोजींना वीरमरण आले. राजगडावर पोहोचल्यानंतर ही बातमी समजल्यानंतर महाराजांनी चार फेब्रुवारी १६६४ रोजी वडगाव येथे येऊन त्यांची समाधी बांधल्याची माहिती महाराष्ट्र गिरिभ्रमण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवींद्र यादव यांनी दिली. या ठिकाणी संपूर्ण माहिती फलक देखील लावण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com