

तळेगाव दाभाडे, ता. ९ : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील खामशेत (ता. मावळ) परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खामशेत व परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गाच्या उभारणीसाठी प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे-मुंबई महामार्गावरील खामशेत परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांना हा महामार्ग ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळी वाहतूक जास्त असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला पायी जाणाऱ्या पालखी व दिंडीतील काही वारकऱ्यांचा या ठिकाणी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी प्रशासनाकडून येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारणीसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्या घटनेनंतर दोन महिने उलटूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरती डागडुजी करण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, खामशेत व परिसरातील नागरिकांनी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, येत्या एका आठवड्यात उड्डाणपूल व भुयारी मार्गाबाबत ठोस निर्णय घेऊन कामाला सुरुवात न झाल्यास खामशेत व परिसरातील ग्रामस्थ १२ मार्च २०२६ रोजी पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. याबाबत विष्णू गायखे, रामदास गायखे, सुरेश जाधव, अतुल कार्ले, बाळकृष्ण गायखे, तुकाराम गायखे आदी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी मावळ, तहसीलदार मावळ, कामशेत पोलिस ठाणे तसेच प्रांत अधिकारी मावळ यांना देण्यात आल्या आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.