मावळातील तरुणांची लग्नासाठी ‘अग्निपरीक्षा’
तळेगाव दाभाडे, ता. १३ : ग्रामीण भागात पूर्वी शेती, कुटुंबाची ओळख आणि नातेसंबंधांच्या आधारे विवाह सहजपणे जुळत असत. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत वधूपक्षाकडून वाढलेल्या अपेक्षांचे ओझे, नोकरीची अट आणि शहरी जीवनशैलीचे आकर्षण यामुळे मावळ तालुक्यातील अनेक तरुणांसमोर विवाह जुळविताना अडचणी निर्माण होत आहेत. लग्नाच्या बाबतीत अनेक तरुणांना अक्षरशः ‘अग्निपरीक्षा’ द्यावी लागत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
पूर्वी गावागावांत नातेवाईक असत. त्यामुळे ओळखी निघत आणि नातेसंबंध जुळून येत. शेतीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील तरुणांनाही वधू मिळण्यात अडचण येत नसत. गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली असून प्रामुख्याने वधूपक्षाच्या अपेक्षांना अंत राहिलेला नाही. अनेक अटी पुढे केल्या जातात. परिणामी शेती व्यवसाय करणाऱ्या अनेक तरुणांना विवाहासाठी नकार मिळत आहे.
मावळ तालुका प्रामुख्याने शेतीप्रधान असला तरी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे तरुणांचे शहराकडे जाण्याचे आकर्षण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर वधूपक्षाकडूनही शहरात स्थायिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने विवाह जुळवण्याऐवजी वधू-वर सूचक मंडळ, संस्था किंवा ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्याकडे पालकांचा कल वाढल्याचे दिसते. विवाह जुळवणी करणाऱ्यांच्या मते, अनेक प्रस्ताव चर्चेपर्यंत येतात; मात्र वाढत्या अपेक्षांमुळे अंतिम टप्प्यात मोडतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांचे विवाह उशिरा होत असल्याचेही स्पष्ट होत आहे.
---
वधूपक्षाच्या वाढत्या अपेक्षा
- नवरदेव किमान पदवीधर असावा
- शेतीपेक्षा नोकरीला प्राधान्य
- प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी हवी
- नोकरी नसल्यास स्थिर व्यवसाय हवा
- लहान व स्वतंत्र कुटुंब अपेक्षित
- चारचाकी वाहन व शहरात घर
- पुणे-मुंबई परिसरात स्थायिक असावा
---
पूर्वी विवाह जुळवताना अपेक्षा मर्यादित असत. मात्र आता नोकरी, शहरात घर, वाहन अशा अनेक अटी पुढे केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लग्न जुळवताना अडचणी येत आहेत.
- भाऊसाहेब आवारे, विवाह जुळविणारे, मावळ
-----
फोटो
03312
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

