कामशेतमध्ये मित्राचा खून, साथीदारालाही मारण्याचा प्रयत्न

कामशेतमध्ये मित्राचा खून, साथीदारालाही मारण्याचा प्रयत्न
Published on

तळेगाव दाभाडे, ता.३० : पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरुन मित्राचा खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील कामशेत येथे घडली. हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी दोन आरोपींनी साथीदारालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कामशेत पोलिसांनी अवघ्या तीन तासांत दोन आरोपींना अटक केली.
आकाश दत्ता पिंगळे (वय २९, रा. साई, ता. मावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर निखिल उर्फ दाद्या जितेंद्र माने (रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत), रणजीत रामचंद्र वाडेकर (रा. दौंडे कॉलनी, कामशेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याच प्रकरणातील त्यांचा साथीदार व तिसरा आरोपी रोहिदास अशोक चव्हाण (रा. चिखलसे, ता. मावळ) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्री जीवन हॉस्पिटल येथील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा मृतदेह मिळाला होता. तपासादरम्यान हा मृतदेह आकाश पिंगळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळाचा पंचनामा, न्यायवैद्यकीय नमुने, ठसे तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास वेगाने पुढे नेला. त्यातून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत आकाश पिंगळे हा आरोपी निखिल माने यांच्या पत्नींकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून तिघांनी मिळून त्याचा दगडाने ठेचून खून केला. मात्र, हा प्रकार बाहेर सांगितला जाईल, अशी भीती निर्माण झाल्याने आरोपी निखिल माने आणि रणजीत वाडेकर यांनी तिसरा साथीदार रोहिदास चव्हाण याच्यावरही दौंडे कॉलनी परिसरात दगडाने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com