बाजार समितीचा चेंडू पणन मंत्रालयाच्या कोर्टात

बाजार समितीचा चेंडू पणन मंत्रालयाच्या कोर्टात
Published on

तळेगाव दाभाडे, ता. २३ : मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी राज्याच्या पणन मंत्रालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या वादाचा चेंडू न्यायालयातून थेट मंत्रालयाच्या कोर्टात पोहोचला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
मावळ तालुक्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष नेहमीच ठळक राहिला आहे. बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ संचालक असताना भाजपचे केवळ पाच सदस्य होते. मात्र, भाजपचे सुभाष जाधव सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ संचालकांना सामूहिक राजीनामे देण्याचे निर्देश आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले होते. त्यानंतर उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेत प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती केली.
दरम्यान, या निर्णयाविरोधात भाजपच्या पाच सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पणन मंत्र्यांनी दोन आठवड्यांच्या आत सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय आता मंत्रालय स्तरावर होणार आहे.
सध्या प्रशासकांकडून बाजार समितीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू असून, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, २८ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप आणि सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे पणन मंत्री भाजपचे असल्याने या निकालाकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com