

तळेगाव दाभाडे, ता. १४ : ‘‘मावळ तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू करणारे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या निधनाने आपुलकीचे, कर्तृत्ववान पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,’’ अशा शब्दांत तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मदन बाफना यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘‘सरपंच ते राज्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आमदार ते मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवूनही त्यांनी कधी मोठेपणा दाखविला नाही,’’ असे सांगत या पदाधिकाऱ्यांनी बाफना यांच्या कार्याचे स्मरण केले.
बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री, भाजप : ‘‘मावळ तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून मदन बाफना यांचे नाव कायम स्मरणात राहील. तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मावळची मोठी हानी झाली आहे.’’
बबनराव भेगडे, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : ‘‘मावळचे भाग्यविधाते आणि आमचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमच्यासारख्या अनेकांना त्यांनी घडविले. त्यांचे मार्गदर्शन आणि आत्मीय नाते स्मरणात राहील.’’
गणेश खांडगे, मावळ तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस : ‘‘मदन बाफना यांनी सर्वसामान्य माणसाशी जपलेले नाते, समाजाच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व, आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची शैली कायम स्मरणात राहील.’’
यशवंतराव मोहोळ, मावळ तालुका अध्यक्ष, काँग्रेस : ‘‘मदन बाफना यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील सर्वसामान्यांच्या कामासाठी तत्पर असणारा नेता हरपला आहे. त्यांच्या काळात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याचे काम झाले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिकारी वर्गावर त्यांचा प्रभाव होता.’’
राजेश खांडभोर, जिल्हाप्रमुख, शिवसेना : ‘‘मदन बाफना हे उत्तम वक्ते होते. मनात असलेले ते स्पष्टपणे बोलायचे. मावळ तालुक्यातील गावागावांत आजही त्यांना मानणारी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात. शासकीय अधिकाऱ्यांवर त्यांचा वेगळाच वचक होता. त्यांच्या निधनाने मावळच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे.’’
मच्छिंद्र खराडे, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना (यूबीटी) : ‘‘मदन बाफना यांचे नेतृत्व विलक्षण होते. सर्व समाजावर त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाची पकड होती. कामाची सखोल माहिती असल्याने प्रशासनावर त्यांचा धाक होता. पायाभूत सुविधा मर्यादित असतानाच्या काळातही त्यांनी मावळच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या जाण्याने मावळवासीयांना ज्येष्ठ मार्गदर्शकाची उणीव निश्चितच भासेल.’’
VDM26B12304
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.