

तळेगाव दाभाडे, ता. २२ : ‘‘मावळ तालुक्यात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथे दुष्काळ परिस्थिती जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी,’’ या मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीने मावळच्या तहसीलदारांना दिले. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
तालुक्यात पावसाअभावी शेतकरी संकटात असून प्रशासनाने पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे. पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत, विमा भरपाई आणि दुष्काळी सवलती मिळाव्यात, तसेच शेतीसाठी वीज-पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याची टंचाई लक्षात घेता मावळ आणि पिंपरी-चिंचवडमधील नवीन बांधकामांबाबत योग्य निर्णय घ्यावा, असेही यात नमूद आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष दत्ता पडवळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष आशिष ठोंबरे, भरत ठाकूर, खंडू तिकोने, अतुल राऊत, शहादान चौधरी, बाळासाहेब फाटक, संभाजी लेंडगर, विशाल वाळुंज व कार्यकर्ते उपस्थित होते. घ