मावळसाठी जुलै २०२७ पर्यंत पाणीसाठा आरक्षित

मावळसाठी जुलै २०२७ पर्यंत पाणीसाठा आरक्षित
Published on: 

तळेगाव दाभाडे, ता. ३० : मावळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी जुलै २०२७ पर्यंत आवश्यक पाणीसाठा आरक्षित करण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच पवना, इंद्रायणी आणि आंद्रा नदीवरील नादुरुस्त कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिले.

पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा, शेती सिंचन आणि उपलब्ध जलसाठ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. आमदार सुनील शेळके हे बैठकीला उपस्थित होते.

नदीकाठच्या गावांना दिलासा
पवना, इंद्रायणी आणि आंद्रा नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नद्यांवरील नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन जलसंपदा विभागाकडून देण्यात आले. धरणांमधून आवश्यकतेनुसार पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे.

शेतीच्या पाण्याचेही नियोजन
मावळ तालुक्यातील गावांसाठी जुलै २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा आरक्षित ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मदत होण्याची अपेक्षा आहे. नदीकाठच्या गावांमधील पाण्याची उपलब्धता आणि शेतीची गरज लक्षात घेऊन जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला.

दरम्यान, एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाच्या अनिश्चिततेची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीसाठीही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील, यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीबचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- जुलै २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे नियोजन
- पवना, इंद्रायणी आणि आंद्रा नदीवरील नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांची दोन महिन्यांत दुरुस्ती
- धरणांमधून आवश्यकतेनुसार पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन. पाणीटंचाई टाळण्यासाठी जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आणि पाणीबचतीवर भर

पुणे ः कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.