आंदर मावळची सुकन्या बनली फौजदार

आंदर मावळची सुकन्या बनली फौजदार

टाकवे बुद्रुक, ता. १० : आंदर मावळ भागातील फळणे या गावातील श्रुती संजय मालपोटे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उज्वल यश संपादन करत तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. राज्यात मुलींमध्ये तिचा तिसरा क्रमांक आला आहे. त्यामुळे मावळची सुकन्या पोलिस खात्यात जाणार असल्याची ही बाब मावळवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. तर प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या मुलीने यशाचे शिखर गाठले असल्याचे सांगताना तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत श्रुतीला ५४० पैकी ४०४.५० गुण संपादन करीत तिने पोलिस उपनिरीक्षकपद मिळवले. श्रुतीने आपल्या गावातील पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. फळणे येथे त्यांचा वडिलोपार्जित शेती व्यवसाय आहे. तिचे वडील शेती व्यवसायासह पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. आजोबा बंडोबा मालपोटे हे टाकवे बुद्रुक येथील संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष आहेत.
दरम्यान, फळणे गावातून पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल श्रुतीचे अभिनंदन करण्यासाठी गावातील पहिले ते चौथीतील विद्यार्थी व शिक्षकांनी सत्कार केला. टाकवे-वडेश्वर जिल्हा परिषद भाजप गट अध्यक्ष रोहिदास असवले व आमदार सुनील शेळके यांनी तिची भेट घेऊन तिचे कौतुक केले. गावातील नागरिकांनी व आजूबाजूच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून सत्कार केला.

यशाचे शिखर गाठण्यापर्यंतचा प्रवास
श्रुतीचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फळणे येथे झाले. पाचवी ते दहावीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टाकवे येथे झाले. अकरावी ते बारावीचे शिक्षण व्ही.पी.एस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणावळा येथे तर बी कॉमचे शिक्षण प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी येथे झाले.

पदवी परीक्षनेतंर २०१९ मध्ये तिने अभ्यासाला सुरुवात केली. त्यासाठी तिला हनुमंत हांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मैदानी चाचणीच्या तयारीत हुरसाळे यांचे मार्गदर्शन मिळाले. २०२० ची जाहिरात लागली. मात्र, कोरोना महामारीमुळे परीक्षा बऱ्याचदा पुढे गेल्या. सप्टेंबर २०२१ मध्ये तिने पूर्व परीक्षा, सप्टेंबर २०२२ मध्ये मुख्य परीक्षा, फेब्रुवारी २०२३ ला नाशिक येथे मैदानी चाचणी, मार्च २०२३ ला मुलाखत दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग क्षेत्रात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलांनी येऊन जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आई वडिलांचे नावलौकिक केले पाहिजे. मुलांनी स्वतःतील क्षमता ओळखून या क्षेत्रात यावे.
- श्रुती मालपोटे


श्रुती संजय मालपोटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com