कुसूरमधील ऐतिहासिक अष्टकोनी टाक्याची दुरवस्था

कुसूरमधील ऐतिहासिक अष्टकोनी टाक्याची दुरवस्था

टाकवे बुद्रुक, ता.१६ : आंदर मावळ भागातील कुसूर गाव आणि ऐतिहासिक कुसूर व्यापारी घाटामार्गाजवळील असलेल्या पुरातन अष्टकोनी टाक्याची (तळे) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याचे काही दगड निखळून खाली पडले आहेत; तर काही नाहीसे झाले आहेत. कोकणातील भिवपुरी येथील टाक्याप्रमाणेच कुसूरचे टाके पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याला राज्य शासनाकडून संवर्धनाची जोड देणे गरजेचे आहे.
आंदर मावळ भागातील कुसूर हे ऐतिहासिक गाव. ब्रिटिश नोंदीनुसार मावळच्या नकाशातील शेवटचे व महत्त्वाचे गाव. ऐतिहासिक कुसूर गाव विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये पहिल्यांदा त्याचा उल्लेख १८२८ च्या ब्रिटिश गॅझेटमध्ये आढळतो. तर दुसरा उल्लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शब्दकोशामध्ये आढळतो. कोकण आणि मावळमधील दळणवळणाच्या घाट रस्त्यांचे हे गाव.

भिवपुरी - कुसूरमध्ये हुबेहूब अष्टकोनी टाकी
कोकणातील भिवपुरी ते मावळातील कुसूर गाव यामध्ये साडेपाच मैल अंतराचा ऐतिहासिक घाट आणि या घाट रस्त्यावर दोन्ही बाजूला हुबेहूब अष्टकोनी टाके (तळे) आहेत. एक टाके भिवपुरीमध्ये तर दुसरे कुसूरमध्ये आहे. साधारण १८०० च्या काळातील बांधणीचे हे दोन्ही अष्टकोनी टाके त्यावेळी व्यापारी मार्ग म्हणजेच ऐतिहासिक कुसूर घाटाने होणाऱ्या दळणवळणातील एक विसावा म्हणून होते. हे जोड टाके अहिल्याबाई होळकर यांच्या कालखंडात बांधण्यात आले. वाटसरूंसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था म्हणून या दोन टाक्यांची निर्मिती करण्यात आली. या अष्टकोनी टाक्यांच्या परिसरात असलेल्या सर्व स्थळांबद्दल व घाट रस्त्यांबद्दल १८२८ च्या ब्रिटिश गॅझेटमध्ये माहिती नोंदण्यात आली आहे.

भिवपुरीतील टाक्याचे पर्यटन मंत्रालयाकडून संवर्धन
मावळ ॲडव्हेंचर चॅरिटेबल ट्रस्ट २००७ पासून ऐतिहासिक कुसूर घाटावर काम करत आहे. तेथील सर्व ऐतिहासिक वास्तू जतन आणि संवर्धन करीत आहे. या ऐतिहासिक मार्गावरील भिवपुरी येथील जोड टाक्याचे राज्य पर्यटन विकास मंत्रालयाच्यावतीने संवर्धन करण्यात आले आहे. पण, मावळातील दुसरे जोड टाके अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे, तळ्याच्या भिंतीची पडझड झाली असून तळ्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

कुसूर परिसरातील ऐतिहासिक स्थळे पुनरुज्जीवनासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने तसा ग्रामसभेमध्ये ठराव करायला हवा. तो ठराव पुढे जिल्हा परिषद, पर्यटन विभागाकडे जायला हवा. राज्य पर्यटन विकास मंत्रालय ऐतिहासिक वास्तू स्थळे संवर्धन आणि जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करते.
- विश्वनाथ जावळीकर, मावळ ऍडव्हेन्चर
PNE24U20257

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com