पर्यटनाचे हॉटस्पॉट ठरतेय प्राचीन कोंडेश्वर मंदिर

पर्यटनाचे हॉटस्पॉट ठरतेय प्राचीन कोंडेश्वर मंदिर

Published on

टाकवे बुद्रूक, ता. २२ : नाणे मावळातील दुर्गम जांभवली गावाशेजारील सह्याद्री पर्वतरांगेशेजारी वसलेलं प्राचीन कोंडेश्वर मंदिरात पर्यटकांची तसेच भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहावयास मिळत आहे. हे मंदिर ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौंदर्याने समृद्ध असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे.
मावळात गेल्यावर्षी पाच तीर्थक्षेत्रांना आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला. त्यात जांभवली येथील कोंडेश्वर मंदिराचाही समावेश आहे. याठिकाणी दर आठवड्यात विशेषतः शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. सळसळते धबधबे, हिरव्यागार टेकड्या आणि धुक्याचा आभास यामुळे हा परिसर पर्यटकांना खुणावत असून, चिंब भिजण्याचा आनंद, निसर्गसंगतीची अनुभूती आणि भक्तिभावाची शांती यांचा एकत्रित अनुभव याठिकाणी मिळत आहे. तसेच दर सोमवारी या मंदिरात महाप्रसादाची सोयही करण्यात येत आहे. मात्र, काही महत्त्वाच्या सुविधाही याठिकाणी मिळाल्या तर हे मंदिर पर्यटक व भाविकांसाठी परिपूर्ण ठरणार आहे.

या सुविधांची आवश्यकता
- पिण्याच्या पाण्याची सोय परंतु नळाला पाणी नाही
- महिलांसाठी बांधकाम स्वरूपात शौचालयांची आवश्यकता
- कुंडाशेजारी पर्यटकांसाठी सुरक्षिततेसाठी सूचनाफलक हवे
- कचऱ्यासाठी बांधकाम स्वरुपातील कचराकुंडी हवी
- वाहनतळाच्या पावतीचे दर अधिक असून, ते कमी होणे आवश्यक
- विकेंडला पोलिसांची उपस्थिती आवश्यक

पोलिस बंदोबस्ताची गरज
पर्यटकांची सतत वाढती संख्या लक्षात घेता, मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त असावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व ट्रस्टच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात आधीच पत्रव्यवहार झालेला असून, सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
कोंडेश्वर मंदिराबरोबरच उकसान व पाले लेणी, ढाकभैरी लेणी, वडिवळे धरण परिसर हा पर्यटकांना भुरळ घालत आहेत. यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहन चालक, विक्रेते, स्थानिक उत्पादने विकणारे यांना चांगला फायदा होत आहे. याठिकाणी रोजगार निर्मिती होत असून नाणे मावळच्या पर्यटनवाढीस बळ मिळत आहे.

त्रिवेणी संगम म्हणजेच कोंडेश्वर मंदिर
कोंडेश्वर मंदिर परिसर म्हणजे श्रद्धा, निसर्ग व इतिहास यांचा त्रिवेणी संगम आहे. विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांची उत्स्फूर्त गर्दी आणि निसर्गाची भरभरून उधळण यामुळे हे ठिकाण एक पर्यटन हॉटस्पॉट म्हणून नावरुपाला येत आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण आज एक अविस्मरणीय अनुभव बनले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या दुपटीने वाढत असल्यामुळे, व्यवस्थापनासाठी ट्रस्टबरोबर स्थानिक ग्रामस्थही सहकार्य करत आहेत.

‘‘मंदिर ट्रस्टने वाहनतळाचे दर कमी करायला हवेत. तसेच याठिकाणी पक्क्या बांधकामात शौचालये व विकेंडला पोलिस बंदोबस्तासाठी ट्रस्टसोबत लोकप्रतिनिधींची भेट घेऊन या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’
- किरण ठाकर, स्थानिक ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com