दावणी रिकाम्या, गोठे ओस...
टाकवे बुद्रुक, ता. २८ : ट्रॅक्टर, आधुनिक अवजारे आणि नवनवीन यंत्रसामग्री बाजारात उपलब्ध झाल्यानंतर शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलू लागले आहे. कमी कष्टात आणि कमी वेळेत शेतीकामे पूर्ण होऊ लागल्याने पारंपरिक लाकडी नांगर, कुळव, बैलगाडी यांसारखी अवजारे हळूहळू नामशेष होत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सोबती म्हणजेच बैल पाळणेही खर्चिक होऊ लागले. वर्षातून काहीवेळासाठीच फक्त आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनी बैलजोड्या पाळणे कमी केलं. त्यामुळे मावळातील अनेक गोठ्यात, घराबाहेर दावणीला बांधणाऱ्या बैलजोड्या दिसेनाशा झाल्या आहेत.
पूर्वीची शेती पारंपरिक होती. यंत्राची जोड कमी होती. त्यामुळे बैलांविना शेतीत काम करणे अशक्यच होते. खरीप हंगामात भात, नाचणी, तीळ, सावा, वरई ही पिके तर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, वाटाणा, मसूर, हुलगे, मूग, चवळी, तूर, सूर्यफूल ही पिके मुबलक प्रमाणात घेतली जात होती. याच पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांचे आणि बैलांचे कष्ट दिसून येत होते. शेतीविना घरगाडा चालविणेही त्यावेळी अशक्य होते. सध्या शेतीविक्री, नोकऱ्या, कमी कष्ट आणि बाजारातील नवनवीन यंत्रांची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा मोठी असणारी बैलसंख्या विरळ झाली आणि त्यामुळे बैलांचं पूर्वीचं असलेलं महत्त्वही कमी होऊ लागलं आहे.
बैलजोडी म्हणजे कुटुंबातील सदस्य
जुने शेतकरी आणि बैलजोडीचे नाते परस्परावलंबी, भावनिक आणि विश्वासाचे होते, जे भारतीय कृषी संस्कृतीचा पाया मानले जात होते. शेतकरी आपल्या बैलांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवत. शेतीची कामे आणि बैलजोड्यांवरच पूर्णपणे घर अवलंबून असत. आज बैलांची जागा यांत्रिकीकरणाने घेतली असली तरी, हे नाते ग्रामीण जीवनाचे खरे रूप होते.
बैलांची प्रमुख कामे
- शेतीतील मशागत (नांगरणी, पेरणी, कुळवणी)
- बैलगाडीतून प्रवास
- चाऱ्याची आणि धान्याची वाहतूक
- खळ्यात पिकांची मळणी
- पाणी वाहतूक
का घटतेय बैलसंख्या?
- बाजारात विविध प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध
- यंत्रांसाठी शासनाकडून कर्ज व अनुदान
- वारसांची शेतीकडे अनास्था; अत्यल्पभूधारक किंवा भूमिहीन स्थिती
- बैलांचा सांभाळ खर्चिक
- पशुखाद्य व चारा महाग
- तरुण पिढीचा नोकऱ्यांकडे कल
- पारंपरिक शेतीबाबत कमी होत चाललेली इच्छाशक्ती
सध्याच्या काळात बैलगाडीचा वापर
- ग्रामीण पर्यटन : ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी फेऱ्यांचे आयोजन केले जाते. बारामती, महाबळेश्वर आणि कोल्हापूर येथील कृषी पर्यटन केंद्रांमध्ये पर्यटकांना बैलगाडीची सफर घडवली जाते.
- चित्रपट व मालिका चित्रीकरण : ग्रामीण पार्श्वभूमी दर्शविणाऱ्या मराठी व हिंदी चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांमध्ये पारंपरिक दृश्यांसाठी बैलगाड्यांचा वापर केला जातो.
- ऐतिहासिक व सांस्कृतिक सोहळे : शिवजयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन मिरवणुका तसेच ऐतिहासिक देखावे आणि पारंपरिक वेषभूषेच्या कार्यक्रमांत बैलगाड्यांचा समावेश केला जातो.
- विवाह व खास समारंभ : ग्रामीण भागात वरात किंवा विशेष प्रवेशासाठी सजविलेल्या बैलगाड्यांचा आकर्षक आणि पारंपरिक वापर केला जातो.
‘‘जुन्या शेतकऱ्यांची खरी ताकद बैल होती. बैलांशिवाय घर आणि गोठा अपूर्ण वाटायचा. दावणीला बांधलेली बैलजोडी ही घराची प्रतिष्ठा मानली जायची. काहीजण भूमिहीन असले, तरी कुळाने किंवा खंडाने जमीन कसत आणि त्यांच्या घरीही बैल असायची.’’
- रायबा भोईरकर, जुने शेतकरी, भोयरे
‘‘बैल संभाळणे किंवा पारंपरिक शेती करणे आताच्या शेतकऱ्यांची इच्छाशक्ती नाही. बैलांद्वारे आणि ट्रॅक्टरद्वारे शेती करण्यात मोठा फरक आहे. बैल आणि नांगराद्वारे जमीन पलटी होत होती. त्यामुळे जमिनीत आवश्यक जिवाणूंची वाढ व्हायची. जमिनीत हवा खेळती राहायची आणि पिकांना पोषणतत्त्वे मिळायची. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळायचे. आता मात्र यंत्राद्वारे आणि रासायनिक खतामुळे कमी उत्पन्न मिळून शेती नापिक होत आहे. सध्या पारंपरिक शेती करणे गरजेचे आहे.’’
- रोहिदास लखीमले, प्रगतशील शेतकरी, भोयरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

