अतिउच्च दाब विद्युत वाहिनी प्रकल्प स्थगित करा

अतिउच्च दाब विद्युत वाहिनी प्रकल्प स्थगित करा

Published on

टाकवे बुद्रुक, ता. १ २ : ‘‘मावळ तालुक्यातील खांडी, कुसुर, नाणे मावळ, शिवणे आदी गावांच्या हद्दीतून प्रस्तावित असलेल्या ७६५ के.व्ही. अतिउच्च दाब विद्युत वाहिनी प्रकल्पाला तत्काळ स्थगिती द्यावी,’’ अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात कोंडीवडे -कांब्रे ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव मंजूर करून प्रकल्पास विरोध दर्शविला आहे.
एका खासगी कंपनीकडून प्रस्तावित असलेली ही विद्युत वाहिनी सुमारे ६४ मीटर रुंद पट्ट्यातून सुपीक व बागायती शेतजमिनीतून तसेच काही ठिकाणी वस्ती भागातून जाणार आहे, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाचे सर्वेक्षण करताना ग्रामपंचायत तसेच कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी या जमिनीत त्यांनी पॉलीहाऊस, जनावरांचे गोठे, फार्म हाऊस तसेच आंबा, नारळ, चिकू यांसारख्या विविध फळझाडांची लागवड केली आहे. त्यामुळे प्रस्तावित विद्युत वाहिनीमुळे शेतकऱ्यांची उभी केलेली शेती, फळबागा व शेतीपूरक व्यवसाय धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच प्रस्तावित विद्युत वाहिनी काही ठिकाणी एका शेतजमिनीचे दोन भाग करून जाणार असल्याने शेती करणे अत्यंत अडचणीचे होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनाला रयत प्रहार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष भरत मोरे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्या
- या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना तुटपुंजी मोबदला देण्याऐवजी जमिनीचा योग्य भाडेपट्टा (वार्षिक भाडे) द्यावा
- टॉवरचा दर आणि वाहिनीखालील जमिनीचा दर सर्व गावांमध्ये समान ठेवण्यात यावा
- विद्युत वाहिनी सध्याच्या मार्गाऐवजी गावाच्या पूर्व किंवा पश्चिम बाजूने पर्यायी मार्गाने न्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com