

टाकवे बुद्रुक, ता.१३ : मावळ तालुक्यात उन्हाळ्यात डोंगरांना वणवे लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या रांगांवरील तसेच पठारावरील मौल्यवान वनसंपदा, झाडे आणि वन्यजीवांचे अतोनात नुकसान होत आहे. हे वणवे नैसर्गिक कारणांशिवाय मानवी निष्काळजीपणामुळे लागत आहेत.
मावळात गेल्या काही दिवसांत वणवा लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वणव्यांमुळे पठारावरील संपूर्ण रान जळाले असून वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. पठारावरील सर्व चारा जाळून खाक झाल्याने तिथे राहणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधीकाळी मोठमोठी जंगले असणाऱ्या मावळच्या सह्याद्रीचा डोंगर आता उघडाबोडका दिसू लागला आहे. घनदाट जंगलातील दुर्मीळ औषधी वनस्पती, पशुपक्षी वणव्यात जळून खाक होत आहेत. वणवे लागल्याच्या कित्येक घटना गावकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. परिणामी पशु-पक्षी यांच्या अधिवासास धोका पोहोचत असून वणव्यांसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे. वन विभागाने डोंगरांना लागणारे वणवे रोखण्यासाठी आणि निसर्गाची हानी टाळण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.
धरणसाठ्यांवरही परिणाम
- वणवा लावल्यामुळे गवत चांगले येते, असा अनेकांमध्ये गैरसमज
- वणव्यामुळे गवताच्या मुळांनी धरुन ठेवलेली माती मोकळी होते.
- पहिल्या पावसात मोकळ्या मातीने डोंगरदऱ्यांमधून गढूळ पाणी वाहते
- धरणांमध्ये मातीचे प्रमाण वाढून धरणातील पाणीसाठ्यात घट
निसर्गातील जीवांना धोका
सांबर, भेकर, ससे, साळींदर, कोल्हे, तरस, बिबटे, शेकरू, पिसोरी, रानडुक्कर हे वन्यप्राणी तसेच सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या असे असंख्य जीव सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खेळत, बागडत आहेत. त्याचबरोबर ही सजीवसृष्टी निसर्गचक्र संतुलीत राखण्याचे काम चांगल्या पद्धतीने करीत आहेत. मात्र, वणव्यांमुळे हे जीव आगीत होरपळत असल्याने निसर्गचक्रावर याचा दुष्परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.