
या चिमण्यांनो परत फिरा रे....!
तळेगाव स्टेशन, ता. ४ : शहरीकरणात आसरे नष्ट झाल्याने दुर्मिळ होत चाललेल्या चिमणी पक्षाचे संवर्धन करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. येत्या वीस मार्चला चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर घर तेथे घरटे मोहिमेअंतर्गत नगरपरिषद हद्दीत किमान पाच हजार चिमण्यांसाठी घरटी बनविण्याचा संकल्प मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी कृत्रिम घरटे बनविण्याच्या कार्यशाळेच्या निमित्ताने केला.
चिमणी अगदी लहानथोरांपासून प्रत्येकाच्या ओळखीचा पक्षी. लहानपणी आई घास भरवताना हा घास चिऊचा असे सांगून बाळाला वरणभात भरवते. दुर्दैवाने घराघरांत सांगितल्या जाणाऱ्या चिऊ-काऊंच्या गोष्टीतील ही चिमणी आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. त्यामुळेच चिमणी संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियान आणि जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि अविज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी कृत्रिम चिमणी घरटे बनविण्याच्या कार्यशाळेचे शुक्रवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, प्रिया नागरे, सुवर्णा काळे, सिद्धेश महाजन, जयंत मदने तसेच शाळांचे शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षक अविज फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश नागरे यांनी पक्षी आणि त्यांची घरटी याबाबत चित्रफितींच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच प्रायोरिटीज आणि इतर साहित्य वापरून प्रत्यक्ष घरटी तयार करून दाखविली.
महिला बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, जनसंपर्क अधिकारी रवींद्र काळोखे यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आता आपापल्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना घरटी बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. बनविलेली घरटी विद्यार्थी आपापल्या घराच्या आवारात लावून चिमण्यांना राहण्यास येण्यासाठी साद घालणार आहेत. यामुळे चिमण्यांची संवर्धन आणि संरक्षण होण्याची आशा आहे.