नवा विश्वात्मक धर्म निर्माण व्हावा

नवा विश्वात्मक धर्म निर्माण व्हावा

मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला
तळेगाव स्टेशन, ता. ५ : ‘‘दुःखमुक्त मानवता निर्माण करणारी राजकीय, धार्मिक, सामाजिक व्यवस्था पाहिजे. हिंसेमध्ये मजा नाही. क्रौर्यामध्ये सुख नाही. सहजीवन सिद्ध करण्यासाठी जगा आणि जगू द्या, हा महावीर तत्त्वज्ञानाचा विचार महत्त्वाचा आहे. मानवतेच्या कल्याणासाठी सर्व धर्मांच्या चांगुलपणाची बेरीज करण्याची आज गरज आहे. नवा विश्वात्मक धर्म निर्माण व्हावा यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत,’’ अशी अपेक्षा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित नवव्या मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे ‘भारतीय संस्कृती आणि विश्वात्मकता’ या विषयावरील गुरुवारचे (ता. ४) तिसरे विचारपुष्प गुंफताना डॉ. सबनीस बोलत होते. उद्योग सल्लागार सचिन इटकर अध्यक्षस्थानी होते. माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शाह, निरुपा कानिटकर, संजय साने उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘‘मूल्यात्मक वाटचाल महत्त्वाची आहे. प्रगतीला नैतिकतेची जोड पाहिजे. अन्यथा होणारा विकास हा घातक आहे. भौतिक विकासाबरोबरच आध्यात्मिक स्वरूपाची जबाबदारी देखील हवी. संत एका जातीचे, धर्माचे अथवा देशाचे नसतात. ईश्वर मानणारा धर्म जगाने स्वीकारला. जगात ईश्वरवादी मानवतावाद आहे. मात्र, दुहेरी मानवतावादाची मूस भारतात आहे. एक वैदिक मानवतावाद आणि दुसरा अवैदिक मानवतावाद आहे. अनुयायांच्या आपल्या महापुरुषांचे आणि धर्माचे किती चांगले अथवा वाटोळे करायचे हे त्या धर्माच्या अनुयायांच्या निष्ठेवर आणि डोळसपणावर अवलंबून आहे. विषमता निर्माण करून आणि ती पोसणे हे क्रौय आहे. जाती धर्माच्या पलीकडली अशी मानवतावादी हीच खरी संस्कृती. मानवाच्या कल्याणाचे सामर्थ्य सर्व दिशेने आले तरी स्वीकारतो, अशी व्यापक वेदाची भूमिका हाच खरा धर्म. वैदिक धर्म सर्वांच्या कल्याणामध्ये समाधान मानतो. मूठभर लोकांच्या कल्याणासाठी धर्माची निर्मिती झालेली नाही. धर्माला संकुचित करण्याचे काम काही स्वार्थी लोकांनी केले आहे. संकुचित जाणिवेच्या लोकांनी सर्व धर्म बरबाद करून टाकले. पैगंबरांचा इस्लाम हा समतावादी शांततावादी इस्लाम आहे. आईच्या पायावर स्वर्ग असतो, असे मानणारा इस्लाम आहे. सर्वच धर्मांना असणाऱ्या काळाच्या, प्रदेशाच्या जाणिवेच्या, बुद्धिवादाच्या मर्यादा वजा करून त्याचा गाभा फक्त स्वीकारता आला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत असलेले अंतर पुसता काम नये. श्रद्धा आणि अंधश्रद्धेला विवेक प्रत्येक माणसाच्या विवेकबुद्धीला कळला पाहिजे. संकुचितपणाला फाटा देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या अवघाचि संसार सुखाचा करीन या अभंगातील अवघा या शब्दामध्ये विश्व मावते. ही विश्वात्मकता संतांमध्ये आहे. संतांना धर्म नसतो. जे धर्ममुक्त, जातमुक्त, देशमुक्त असतात, ते संत असतात. क्षमा हा धर्माचा मूलभूत गुणधर्म मानला जातो. आज धर्माच्या नावाने अधर्म नाच करतो आहे. धर्माचे काम माणसाला माणूस बनवणे आहे. मानवता ही संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. देवधर्म हे माणसाच्या कल्याणासाठी असतात. जगाच्या मानवतेचे प्रतीक म्हणजे महात्मा गांधी होते. मारेकऱ्याचे मंदिर उभा करणे हे सांस्कृतिक विघटन, सांस्कृतिक पराभव आहे की संस्कृतीचा विजय आहे, आमच्या प्रगतीची दिशा कोणती, नथुराम गोडसे यांचे कर्तृत्व वंदनीय मानण्याची परंपरा या देशामध्ये घातक आहे. सावरकरांचे राष्ट्रभक्तीचे कर्तृत्व हे नाकारण्याचे कारण नाही. पक्षापक्षाच्या स्वार्थी राजकारणामध्ये स्वातंत्र्यवीराचा बळी देणे योग्य वाटत नाही. महापुरुष साध्य नाहीत तर, विश्वात्मक मानवतेचे कल्याण हे साध्य आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले. संदीप काकडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com