निलंबित मुख्याधिकारी पाटील यांची आता विशेष समितीकडून चौकशी

निलंबित मुख्याधिकारी पाटील यांची आता विशेष समितीकडून चौकशी

तळेगाव स्टेशन, ता.१० : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे निलंबित मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मागचा ससेमिरा सुटेनासा झाला आहे. पाटील यांच्या कारकिर्दीत दिलेली नगर परिषदेची कंत्राटे आणि त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांची चौकशी करण्यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळात बुधवारी (ता.१०) लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची विशेष समिती नेमून पाटील यांच्या कारकिर्दीची चौकशी करणार असल्याचे सांगितले.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (ता.१०) सकाळी लक्षवेधी मांडून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे निलंबित मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या कारकिर्दीतील सर्व कंत्राटे, त्यांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी विकत घेतलेल्या मालमत्तांची चौकशी करणार का ? असा प्रश्न विचारला.
त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘‘तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दुसऱ्याची गाडी घेऊन अपघात देखील केला आहे. महिलांशी अर्वाच्‍च भाषेत बोलल्याच्या तक्रारी विशाखा समितीला प्राप्त झालेल्या आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून संबंधित मुख्यधिकाऱ्याला निलंबित केले आहे. प्रत्येकी एकेका आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती नेमून पाटील यांच्या कारकिर्दीची चौकशी केली जाईल.’’

पाटील यांच्या निलंबनाचा आनंदोत्सव
पाटील यांचे निलंबन झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे शहरातील महिलांसह राष्ट्रवादी काँगेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयासमोर फटाके फोडून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. पक्षाच्या महिला शहराध्यक्षा शैलजा काळोखे, नीलिमा गुंजाळ, विद्या शिळीमकर, संध्या थोरात, उषा शिळीमकर, कालिका घुले, रिद्धी गांगुर्डे, लीना दिघे यांच्यासह गोकुळ किरवे, नवनाथ कुल आणि कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर फटाके फोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com