

तळेगाव स्टेशन, ता. २७ : दररोजच्या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवासी, वाहनचालक आणि एमआयडीसी कामगारांना दिलासा मिळावा, यादृष्टीने गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाला एमआयडीसीकडे हस्तांतरण करून गती द्यावी, अशी मागणी राज्य राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) चे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांना करण्यात आली.
तळेगाव-चाकण- शिक्रापूर आणि वाघोली ते शिरूर या दोन्ही प्रस्तावित उन्नत महामार्गांची बांधणी राज्य शासनाने नव्याने स्थापन केलेल्या राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात एमएसआयडीसीच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्या जुलै महिन्यात विशेष पत्राद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची व्यवहार्यता आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या हेतूने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे, ॲड. अशोक फडके आणि अमोल पवार यांनी एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना त्याबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा केली.
त्याअनुषंगाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून ना हरकत देऊन याबाबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी पुणे-शिरूर रस्त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती हांडे यांनी दिली. तथापि, तळेगाव-चाकण- शिक्रापूर महामार्गाबाबत कुठल्याही हालचाली नसल्याने या महामार्गाचे काम पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कॅबिनेटच्या मंजुरीअभावी काम प्रलंबित
गेल्या १४ फेब्रुवारी २०२४ ला तळेगाव-चाकण-शिक्रापूर चार पदरी उन्नत महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राबविण्यात आली होती. परंतु, आचारसंहितेपर्यंत या रस्त्याला कॅबिनेटची मंजुरी न मिळाल्यामुळे या रस्त्याचे काम रेंगाळले आहे.
आणखी काय आहेत मागण्या...
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेऊन
- विस्तृत प्रकल्प अहवालानुसार, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने २२ मीटर रस्ता रुंदीचे काम त्वरित हाती घ्यावे.
- आवश्यक तेथे भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी
- केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठपुरावा केला जावा
- तळेगाव-चाकण महामार्गावरील काढलेल्या अतिक्रमणांजागेवरच्या साईडपट्ट्या भरून खांब उभे केले जावेत
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला गती देण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.