ग्रामदेवता शितळादेवीसह प्रमुख मंदिरांत नवरात्रोत्सव सुरू

ग्रामदेवता शितळादेवीसह प्रमुख मंदिरांत नवरात्रोत्सव सुरू
Published on

तळेगाव स्टेशन, ता. ३ : तळेगाव दाभाडे शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सवाला जवळपास पाच दशकांहून अधिक काळाची परंपरा लाभली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदेवता शितळादेवीच्या मंदिरासह इतर प्रमुख मंदिरांत गुरुवारी (ता.३) अश्विन शुद्ध द्वितीयेला विधिवत पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच ठिकठिकाणी महाप्रसाद, दांडिया, रास गरबाचेही आयोजन करण्यात आले आहे.
तळेगावच्या गावदेवी मावलाय माता, शितळादेवी, मरीमाता, सटवाईमाता, बोल्हाई मातेच्या मंदिरांसह इतर ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवानिमित्ताने देवीच्या मंदिरांवर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंडप विविधरंगी झालरी आणि रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे बहुतांश देवींच्या मंदिर परिसरात चैतन्य आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसतो आहे.

तुळजा भवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रम
जिजामाता चौकातील जिजामाता देवस्थान ट्रस्ट संचलित श्री तुळजा भवानी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त १२ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत महिला भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर, रोज रात्री आठ वाजता आरती होईल. १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला दुपारी १२ वाजता आरतीनंतर महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

शितळादेवी मंदिरात अष्टमी होमहवन
पै.विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान आणि शितळादेवी मंदिर ट्रस्टच्यावतीने भेगडे आळीतील ग्रामदैवत शितळादेवी मंदिरात नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. रात्री साडेआठ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती झाली. ११ ऑक्टोबरला दुपारी चार वाजता अष्टमी होमहवन होणार आहे.

भोई आळीत भजन, आरती
दुर्गामाता प्रतिष्ठान ट्रस्टच्यावतीने भोई आळीतील श्री दुर्गामाता मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून रोज सायंकाळी ५ ते साडेसात वाजेपर्यंत भजन आणि आरती होणार आहे. गावतळ्याच्या काठावरील मावलाय माता मंदिरात पुजारी किसन पडवळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

इंद्रायणी कॉलनीत महाप्रसाद
इंद्रायणी कॉलनीमधील आदिशक्ती सप्तशृंगीमाता प्रतिष्ठानच्यावतीने श्री सप्तश्रृंगी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली असून रोज सायंकाळी पावणे आठ वाजता देवीची आरती होणार आहे. अष्टमीला होमहवन आणि महाप्रसाद होईल. यासोबतच मरिमाता मंदिर, स्टेशन रस्त्यावरील वरसूबाई मंदिरातही घटस्थापना करण्यात आली असून ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह गरबा, रास, दांडियाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

तळेगावातील मुख्य मंदिरे
श्री तुळजा भवानी जिजामाता चौक, श्री शितळादेवी मंदिर भेगडे आळी, श्री मरिमाता मंदिर भेगडे आळी,
श्री दुर्गामाता मंदिर भोई आळी, श्री शितळा देवी मंदिर गोंधळी समाज (रविवार पेठ), श्री मावलाय माता मंदिर गावतळे, श्री वरसूबाई माता मंदिर स्टेशन रस्ता, श्री तुळजा भवानी मंदिर वतननगर, श्री सप्तशृंगी माता इंद्रायणी कॉलनी.

तळेगाव दाभाडे : श्री तुळजा भवानी ,जिजामाता चौक ,श्री शितळादेवी ,श्री मरिमाता,श्री दुर्गामाता ,श्री मावलाय ,श्री वरसूबाई मंदिर,वतननगरमधील श्री तुळजा भवानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com