उर्सेचा बंद टोलनाका वेळखाऊ आणि धोकादायकही पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ः लोखंडी सांगाडा, टोल बूथ आणि राडारोडा अद्याप जाग्यावरच
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. ८ : टोल नाक्यावर होणारी गर्दी कमी करून, वाहनचालकांचा प्रतीक्षा कालावधी वाचावा, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पूर्वीचा उर्से हद्दीतील टोल नाका दोन किलोमीटर पश्चिमेकडे स्थलांतरित करून, विस्तार करण्यात आला. दुतर्फा लेनची संख्या वाढल्याने नव्या टोल नाक्यावर प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. मात्र, बंद करण्यात आलेल्या जुन्या टोलनाक्याचा सांगाडा, टोल बूथ आणि राडारोडा अद्याप जागेवरच असल्याने तेथील गतिरोधक आणि चिंचोळ्या लेनचा अडथळा पार करणे वाहनचालकांसाठी धोक्याचे, तितकेच जिकिरीचे आणि वेळखाऊ ठरत आहे.
द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यावर होणारी वाढती कोंडी टाळण्यासाठी ‘आयआरबी’कडून पूर्वीचा उर्से टोलनाका मुंबई बाजूकडे दोन किलोमीटर पुढे नव्या ठिकाणी गेल्या महिन्यात कार्यान्वित करण्यात आला. नव्या टोल नाक्यावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर तब्बल ९ लेन कारसाठी तर इतर ५ लेन अवजड वाहनांसाठी अशा प्रत्येकी १४ अर्थात दुतर्फा मिळून २८ लेन उपलब्ध झाल्या आहेत. नव्या विस्तारित टोल नाक्यावरील सुधारित यंत्रणेमुळे वाहनांचा फास्टॅग बूम बॅरियरच्या काही अंतरा अगोदरच रीडिंग होत असल्याने गेट बंद न होता, वाहने विनासायास आणि सुसाट पुढे निघून जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगा दिसेनासे झाल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा प्रतीक्षा कालावधी नगण्य झाल्याचे चित्र आहे.
मात्र, जुन्या टोलनाक्याचा लोखंडी सांगाडा, टोल बूथ, जाहिरात फलक, सूचना फलक, गतिरोधक आणि बांधकाम अद्यापही जागेवरच आहे. मुख्य टोल नाक्याच्या पुढे काही अंतरावर उजव्या बाजूस उभारण्यात आलेले वाढीव ईटीसी टोल बूथ नेमके रस्त्यावर मध्येच आडवे येत असल्याने सुसाट येणारी वाहने धडकण्याचा धोका संभवतो. टोलनाक्यावरील बूथ समोरील उपकरणे आणि सिग्नल काढून नेल्यानंतर उखडलेले सिमेंटचे ढेकूळ, राडारोडा, पीव्हीसी पाईप आणि इतर लोखंडी साहित्य रहदारीच्या रस्त्यावर विखुरल्याने वाहनाच्या चाकाखाली येऊन मोठ्या अपघाताची शक्यता आहे. ‘आयआरबी’ प्रशासनाने येथील हायमास्ट आणि नाक्यावरील विजेचे दिवे बंद केल्याने रात्री काळाकुट्ट अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने ती बूथ अथवा कठड्याला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे.
बंद टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस असलेले गतिरोधक देखील जागेवरच असल्याने बंद टोलनाका पार करताना वाहनांचा वेग मंदावून वेळेचाही अपव्यय होत आहे. बंद टोलनाक्याच्या परिसरात सगळीकडे कचरा, राडारोडा पसरला आहे. लगतची महाराष्ट्र सुरक्षा बल आणि महामार्ग पोलिसांची छावणी हटविल्याने तेथील राडारोडादेखील तसाच जागेवर पडून आहे. त्यामुळे या बंद टोल नाक्याच्या परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. तळेगावहून द्रुतगती मार्गावर बसमध्ये चढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांचे देखील यामुळे हाल होत आहेत. रात्री अंधारात येथे प्रतीक्षा करणे अथवा बसमधून उतरणे जोखमीचे ठरु शकते.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बंद केलेल्या जुन्या टोलनाक्याचे बूथ आणि बांधकाम युद्धपातळीवर हटवून रस्ता मोकळा केल्यास अपघाताचा धोका कमी होईल. वाहनचालकांच्या वेळेची देखील बचत होणार आहे. तसेच येथे एका छोटेखानी सर्वसुविधायुक्त बसथांब्याची व्यवस्था करावी, अशी स्थानिक प्रवाशांची मागणी आहे.
‘‘नव्या टोलनाक्यामधून आता गाडी पटकन निघून जाते. मात्र, बंद केलेला पूर्वीचा टोलनाका पार करण्यासाठी दोन्ही बाजूंचे गतिरोधक आणि चिंचोळा रस्ता पार करण्यासाठी गाडीचा वेग कमी करावा लागतोय. बंद टोलनाक्याचा सांगाडा, गतिरोधक, राडारोडा हटवून रस्ता मोकळा केल्यास आणखी वेळ वाचेल.
- प्रकाश खिलारी, कॅब चालक
‘‘बंद टोलनाक्यामधील उपकरणे, साहित्य, टोलबूथ, फलक, बांधकाम हटविण्याचे काम आयआरबीच्या बांधकाम विभागामार्फत टप्प्याटप्प्याने सुरु आहे. दोन्ही बाजूचे वाढीव ईटीसी टोल बूथचे केबिनही त्वरित हटविण्यात येतील. रहदारीच्या सुरक्षेची दक्षता घेऊन, काही काळात संपूर्ण रस्ता मोकळा केला जाईल. तोपर्यंत परिसरातील पथदिवे आणि हायमास्ट पूर्ववत चालू ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
- नीलेश म्हेत्रे, मुख्य पथकर अधिकारी, आयआरबी
‘‘एसटी आणि खासगी बस मिळून दिवसभरात जवळपास दोनशेहून अधिक प्रवाशांची इथे चढ उतार होते. टोलनाका बंद केल्यानंतर इथे स्वच्छता वेळेवर होत नाही. रात्री अंधार असतो. प्रवाशांना निवारा नाही. रस्ते विकास महामंडळाने प्रवाशांची सोया करावी.
- फुलचंद टेकाळे, एसटी कर्मचारी
उर्से (ता.मावळ) : द्रुतगती मार्गावर १४ मार्गिकांसह कार्यान्वित करण्यात आलेला नवा टोलनाका.
फोटोः 05296, 05297, 05298
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

