थर्माकोलपासून साकारल्या दुचाकींच्या प्रतिकृती

थर्माकोलपासून साकारल्या दुचाकींच्या प्रतिकृती

Published on

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन ता. ४ : पर्यावरणीयदृष्ट्या घातक थर्माकोलपासून वाहनांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याचा छंद तळेगावातील संभाजी रामचंद्र भेगडे यांनी जोपासला आहे. या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देत आहेत.
थर्माकोल वापरावर राज्य सरकारने यापूर्वीच बंदी घातली आहे. तरीही, काही गृहोपयोगी वस्तूंच्या आवरणासाठी ते अजूनही वापरले जाते. पुढे हेच थर्माकोल कचऱ्यात जाते. त्याचे विघटन होत नाही. वर्षानुवर्षे ते निसर्गात पडून राहते. त्यामुळे पाणी आणि मातीचेही प्रदूषण वाढते. काही वेळा ते जाळले गेल्याने हवेचही प्रदूषण वाढते. हेच लक्षात घेऊन तळेगाव नगरपरिषदेतील सेवानिवृत्त लिपिक संभाजी भेगडे यांनी थर्माकोलपासून दुचाकींच्या प्रतिकृती तयार करणे सुरू केले. नव्वदीच्या दशकात भेगडे यांचे ‘बुलेट स्पेशालिस्ट’ गॅरेज होते. पुढे ते नगर परिषदेत नोकरीला लागले. त्याचदरम्यान छंद म्हणून रेडियमच्या नंबरप्लेटही तयार करायचे. त्यातूनच थर्माकोलद्वारे दुचाकींच्या प्रतिकृती तयार करण्याचा छंद त्यांना जडला. कोठेही टाकाऊ थर्माकोल दिसले, की घरी आणून त्याचे चौकोनी तुकडे करून साठवून ठेवतात. कामातून वेळ मिळेल तसे एखाद्या दुचाकीचे मॉडेल बनवायला घेण्याचे नियोजन ठरते. थर्माकोलपासून हेडलाइट, आरसे, इंधन टाकी, इंजिन, मडगार्ड, सायलेन्सर आणि इतर भाग तयार केले जातात. चाके आणि इतर भागांसाठी भंगारातील अ‍ॅल्युमिनियमच्या तार वापरले जातात. हे सुटे भाग एकत्र करून दुचाकीचे मॉडेल तयार केले जाते. यासह गणेशोत्सव, नवरात्री आणि इतर उत्सवांसाठी थर्माकोलपासून मखरे, मंदिरे तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती साकारून त्यावर कलाकुसर करण्याचा छंद भेगडे यांनी जोपासला आहे.

स्वच्छतेचा संदेश...
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत भित्तीचित्र (म्युरल) स्पर्धेसाठी संभाजी भेगडे यांनी २०२१ मध्ये साकारलेली ‘कचरा प्रक्रिया केंद्राची प्रतिकृती’ परीक्षण पथकासमोर लक्षवेधी ठरली. ‘स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, हरित तळेगाव’ असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला. फेब्रुवारी २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आपला छंद आणखी जोमाने जोपासला आहे.

संग्रहालय साकारण्याचा मनोदय...
जुन्या काळातील लोकप्रिय लुना, येझदी, स्कुटरच्या प्रतिकृती साकारण्यावर संभाजी भेगडे यांनी भर दिला आहे. या दुचाकींची नव्या पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने थर्माकोलच्या या प्रतिकृतींचे संग्रहालय साकारण्याचा मनोदय त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com