तळेगावातील शिव-शंभू स्मारकाच्या कामाला प्राधान्य

तळेगावातील शिव-शंभू स्मारकाच्या कामाला प्राधान्य
Published on

सकाळ इम्पॅक्ट

तळेगाव स्टेशन, ता.१८ : ‘‘तळेगाव दाभाडे शहरातील नियोजित शिव-शंभू स्मारकाच्या वास्तूची उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील. नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनादिवशीच या स्मारकाचे अनावरण करण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्राधान्य देणार आहोत,’’ असे आश्वासन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
नगरपरिषदेकडून २०१८ पासून काम रखडल्याने ‘शिव-शंभू स्मारकाचे शिल्प प्रतिष्ठापनेच्या प्रतिक्षेत!’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये मंगळवारी (ता.१८) सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. यानंतर लगेचच दुपारी मुख्याधिकारी सरनाईक यांच्या दालनात शिव शंभू स्मारक समितीचे पदाधिकारी, नगररचना आणि बांधकाम विभागाचे अधिकारी, सल्लागार, वास्तू विशारद आणि कंत्राटदार यांची आढावा बैठक पार पडली.
समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील, संतोष दाभाडे पाटील यांनी स्मारकाची सद्यस्थिती आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेली सहा वर्षे रखडलेल्या कामाची पार्श्वभूमी विशद केली. स्मारकाचा भूखंड, आराखडा, पुतळा स्थापनेसाठी आवश्यक शासकीय कार्यवाही आणि सद्यस्थिती आदींबाबत सरनाईक यांनी माहिती जाणून घेतली. स्मारकासाठी नगररचना विभागाची मंजुरी, पुतळ्याचे आणि चौथऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे, तसेच कला संचालनालय आणि गृह विभागाची परवानगी घेण्याबाबत त्रयस्थ एजन्सीमार्फत तातडीने प्रस्ताव तयार करावा. सर्वेक्षणासाठी स्थळभेटीचे नियोजन करण्याच्या सूचना सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्मारक आवाराचे लँडस्केपिंग, फॅब्रिकेशन आणि इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठी आठवडाभरात तातडीच्या निधीची उपलब्धता करुन देणार असल्याची ग्वाही मुसरनाईक यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. स्मारकाच्या सभोवतालचा राडारोडा आणि अतिक्रमणे त्वरित हटवून लगतच्या ओढ्याची देखील स्वच्छता करण्यात येणार आहे. यासह लिंब फाटा येथील स्वागत कमानीचे रंगकाम तसेच नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या स्वागत कक्षात सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांचा पुतळा उभारणे आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली.
शिव-शंभू स्मारक समितीचे सदस्य सुरेश दाभाडे, संजय बाविसकर, ॲड. विनय दाभाडे, आनंद दाभाडे, संतोष शिंदे, चिराग खांडगे, वास्तू विशारद सचिन शहा, ज्ञानेश भेगडे यांच्यासह शहर अभियंता राम सरगर, नगररचना सहायक गणेश कोकाटे, वीरेंद्र नारगुंडे आढावा बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com