तळेगावात संविधान भूमी स्मारकात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात

तळेगावात संविधान भूमी स्मारकात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात

Published on

तळेगाव स्टेशन, ता. १५ ः तळेगाव दाभाडेमधील ‘संविधान भूमी’ स्मारकासह छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आम्रपाली महिला मंडळ, लोकाधार फाउंडेशन, रमाकांत तरुण मंडळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर संस्था, संघटनांच्यावतीने सोमवारी (ता.१४) आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

आल्टिनो कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान ‘संविधान भूमी’मध्ये जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची रीघ लागली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि महाबोधी मैत्रेय परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वरात्री १३४ अगरबत्ती आणि २५ मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. स्मारकाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, सुत्तपठणानंतर अभिवादन सभा झाली. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्मारकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दुपारी लेखक भगवान धेंडे संचलित अंध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा ‘सुरसागर’ हा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. स्मारक समितीच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘एक पेन, एक वही’ हा उपक्रम राबविण्यात आला. भीम अनुयायांसाठी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. २४ विद्यार्थ्यांकडून १८ तास अभ्यास अभिवादन उपक्रम राबविण्यात आला. स्मारक समितीच्या अध्यक्ष ॲड. रंजना भोसले, सचिव किसन थूल यांच्या मार्गदर्शनाखाली देवानंद बनसोडे, दिनेश गवई, संतोष मेश्राम, भागवत बिऱ्हाडे, किरण शिंदे, प्रज्ञांकुर निकम, रूपेश घोडेस्वार, रमेश खोब्रागडे, रावसाहेब कांबळे, सचिन ससाणे आणि समिती सदस्यांनी नियोजन केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने स्टेशन चौकातील वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीलगत सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नितीन मराठे, आरपीआयचे तळेगाव शहराध्यक्ष संदीप शिंदे, तानाजी गडकर, दिलीप डोळस, किसन खंडागळे, जयवंत बनसोडे, वीणा शिंदे यांच्यासह भीम अनुयायी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी आम्रपाली महिला मंडळ आणि लोकाधार फाउंडेशनच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भीमस्तुती, बुद्धवंदना झाली. याप्रसंगी संस्थेतर्फे ३५ दिव्यांग महिलांना साडी-चोळी आणि दिव्यांग बांधवांना पोशाख भेट देण्यात आला. रात्री स्नेहभोजनानंतर भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकाधार फाउंडेशनचे संस्थापक सुशांत ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष नीता ओव्हाळ आणि आम्रपाली महिला मंडळाच्या लता घोलप, वैशाली शिंदे, धन्वंतरी ननावरे, संगीता साळवे, वंजारे ताई, प्रणाली डांगे, नीता ओव्हाळ, चंद्रा ससाणे, सविता घोरपडे आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
तळेगाव दाभाडे येथील शनिवार पेठेतील रमाकांत नगरमधील बौद्ध विहारात रमाकांत तरुण मंडळाच्यावतीने सकाळी आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. मंडळाच्यावतीने सायंकाळनंतर भेगडे तालीम-गणपती चौक-खडक मोहल्ला-राजेंद्र चौक-तेली आळी-मारुती मंदिर चौक-जिजामाता चौक-शाळा चौक-रमाकांत नगर या मार्गावर ढोल ताशांच्या गजरात, रथावर विराजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या संविधान रथावर बाबासाहेब आणि रमाबाईंची हुबेहूब वेशभूषा केलेली पात्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीवर जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. जयंत कदम, सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष मनोज आगळे आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com