कुंडमळा घटनास्थळावर दिवसभर शुकशुकाट ! ‘एनडीआरएफ’ची शोधमोहीम ः नदीपात्रातील सांगाड्यात अडकल्या दुचाकी

कुंडमळा घटनास्थळावर दिवसभर शुकशुकाट !  
‘एनडीआरएफ’ची शोधमोहीम ः नदीपात्रातील सांगाड्यात अडकल्या दुचाकी
Published on

गणेश बोरुडे ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १६ ः कुंडमळा येथील साकव (पूल) कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १६) पोलिस, प्रशासन, ‘एनडीआरएफ’चे शोध पथक आणि स्थानिक रहिवासी यांची तुरळक वर्दळ वगळता कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीपात्राच्या किनाऱ्यावर शुकशुकाट होता. पुलाच्या लोखंडी सांगाड्यात अडकलेल्या दुचाकी नदीपात्रात दिसत होत्या. कोसळलेल्या साकवचा उर्वरित भाग प्रशासनाकडून दुतर्फा अडथळे लावून बंद करण्यात आला होता.
कुंडमळ्यातील रहिवासी सागर भेगडे यांचे गावकुसाला साकवच्या समोरच हॉटेल आहे. रविवारी दुपारी पूल कोसळल्याचा आवाज आणि पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून सागर यांच्यासह बजरंग दलाच्या दहा-पंधरा स्थानिक कार्यकर्त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. जीव धोक्यात घालून, प्रसंगावधान राखत नदीपात्रात उतरले. दोरखंड आणि कुंड देवीच्या मंदिरावरील शिडीच्या साहाय्याने जवळपास तीस ते पस्तीस जणांना पाण्यातून बाहेर काढले. माळवाडी येथील भारत क्रेन सर्व्हिसचे संचालक साहिल दाभाडे, रोहित दाभाडे, सागर पवार यांनी आपल्या हायड्रा क्रेन्ससह त्वरेने घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती समजताच वन्यजीवरक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, पीएमआरडीए, एनडीआरएफ, सीआरपीएफच्या तुकड्यांसह पोलिस आणि मावळ तालुका प्रशासन त्वरेने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते.

थांबलो म्हणून वाचलो...!
दुर्घटनेतून बचावलेले कुंडमळ्यातील रहिवासी गणेश पवार म्हणाले, ‘‘शेलार मळ्याकडून कुंड मळ्याकडे येताना पुलावर गर्दी होती. पुलावर अंदाजे शंभर ते दीडशे लोक होते. उभे राहायलाही जागा नव्हती. त्यामुळे मी थांबलो म्हणून वाचलो.’’

उत्तरेकडे झुकून ‘तो’ कोसळला
या पुलाचा सांगाडा गतवर्षीच काहीसा मंदिराच्या बाजूला उत्तरेला कलला होता. रविवारी पुलावर जमलेल्या गर्दीतून स्थानिकांच्या दुचाकींना वाट मोकळी करून देण्यासाठी पुलावर उभे पर्यटक उत्तर बाजूला झुकले. साहजिकच त्यामुळे एका बाजूला बोजा वाढला. समतोल बिघडून, कमकुवत झालेला साकव उत्तर बाजूला कलंडून नदीपात्रात कोसळल्याचे स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

देवदूत, जाळी अन् शिडी
घटना घडताच सर्वप्रथम नदीपात्रात उतरलेले सागर भेगडे आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लगतच्या मंदिराची शिडी काढून जखमींना नदीपात्रातून बाहेर काढले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलाईट संस्थेने पुलावर बसविलेल्या संरक्षक जाळीमुळे दुर्घटनेसमयी अनेकांना आधार मिळाला. बरेच जण जाळीत अडकले. कुंड देवीच्या मंदिराची शिडी आपत्कालीन मदतीसाठी लाइफलाइन ठरली. संरक्षक जाळीमुळे दुर्घटनेची तीव्रता कमी झाली. स्थानिक तरुणांच्या तत्पर मदतीने अनेक जण बुडण्यापासून वाचले, असे सागर भेडगे यांनी सांगितले.

हुल्लडबाजीच कारणीभूत
सोशल मीडियाचा वापर वाढल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून अगदी कमी कालावधीत कुंडमळा हे पर्यटनस्थळ उदयास आले. मोठी दुर्घटना पहिल्यांदा घडली असली तरी, गेल्या काही वर्षात दरसाल एक-दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, जोडपी आणि इतर पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना घडल्या आणि बदनाम मात्र आमचे नाव होत आहे, असे इंदोरीचे माजी सरपंच तथा कुंडमळा येथील रहिवासी दिनेश चव्हाण यांनी सांगितले.

आता १५ किलोमीटरचा वळसा
कुंडमळ्यातील शेकडो स्थानिक रहिवासी नदीपात्र ओलांडण्यासाठी वर्षानुवर्षे साकव पुलाचा वापर करीत होते. आता तो कोसळल्यामुळे स्थानिक दूध व्यावसायिक, फुलउत्पादक शेतकरी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तब्बल पंधरा किलोमीटरचा वळसा घालून इंदोरीमार्गे जावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

प्रस्तावित पुलाच्या तांत्रिक अडचणी
शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गतवर्षी आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नवीन पुलाच्या कामाच्या सर्वेक्षणामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. नदीपात्राच्या पश्चिमेला अगदी खेटून भारतीय संरक्षण विभागाची संरक्षक भिंत आणि लगतच हेलिपॅड असल्याने जुन्या साकव पुलाला समांतर नवीन पुलाच्या रचनेत अडचणी आहेत. त्यामुळे नवीन प्रस्तावित पूल हा मंदिराशेजारी उभारण्याऐवजी गावाच्या दक्षिण बाजूने, संरक्षण विभागाच्या पॉवर हाऊसच्या दिशेने नदीपात्राचे आरपार अंतर तुलनेने कमी असलेल्या ठिकाणी उभारावा अशी सूचनावजा विनंती प्रशासनाला केली असल्याचे इंदोरीचे माजी सरपंच तथा कुंडमळा येथील रहिवासी दिनेश चव्हाण यांनी सांगितले.

प्रशासनाकडून दक्षता
मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान सोमवारी (ता. १६) सकाळीच घटनास्थळी पोचले होते. ते म्हणाले, ‘‘कुंडमळा साकव दुर्घटनेत मृत झालेल्या चार व्यक्तींचे मृतदेह हाती लागले असले तरी, आणखी काही जण बेपत्ता असण्याच्या शक्यतेमुळे सोमवारीही एनडीआरएफ पथकाकडून नदीपात्रात शोधमोहीम चालू ठेवली.’’

फोटोः 05923, २३१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com