राग संगीताच्या प्रसारासाठी स्वरवेड्याची आनंदयात्रा
जागतिक संगीत दिनविशेष
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता.२० : शास्त्रीय संगीतामधील गुढवादाचे निर्मूलन करुन नाद, लय, स्वर, ताल, आलाप, राग या गोष्टी सामान्य माणसाच्या आकलन कक्षेत आणण्यासाठी तळेगावातील ज्येष्ठ सतारवादक विदुर महाजन यांनी देश-विदेशातील लाखो सर्वसामान्य संगीतप्रेमींना सतारीच्या माध्यमातून भारतीय राग संगीताची ओळख करुन देण्याचा वसा घेतला आहे. सतारीच्या नादाचा सुयोग्य परिणाम साधत २०१७ पासून पुण्याच्या मुक्तांगण संस्थेमधील व्यसनाधीन तरुणांना ते व्यसनातून व्यासंगाकडे वळण्याची वाट आपल्या आनंदयात्रेतून दाखवत आहेत.
सतार म्हटले की विदुर महाजन हे नाव ओघानेच येते. धारवाडच्या बिनकार घराण्यातील सताररत्न उस्ताद रहमत खान यांचे नातू उस्मान खान यांच्याकडून ८० च्या दशकांत त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. विदुर महाजन यांनी शाहीद परवेज व गान सम्रादिनी किशोरी आमोणकर यांच्या पठडीत स्वतःला एक प्रगल्भ संगीतकार बनविले. त्यातूनच शास्त्रीय राग संगीत प्रसारासाठी सुरू झाली एका स्वरवेड्याची ही आनंदयात्रा. कोलकातामधील हितेंद्र रॉय यांच्याकडून विकत घेतलेल्या एका ख्यातनाम संगीतकाराच्या ६० दशकातील सतारीशी आजही महाजन यांच्या हाताची बोटे लिलया जुळतात आणि त्यातून अप्रतिम नाद उमटतो तो संगीत साधनेचा. त्यांनी तब्बल ११ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा पल्ला गाठत राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील छोट्या मोठ्या गावांमध्ये पोहोचून शास्त्रीय राग संगीताचा प्रसार केला. त्याद्वारे एक लाखांहून अधिक संगीतप्रेमींपर्यंत त्यांनी सतार पोहोचवली. लोणावळ्याच्या कैवल्यधाम या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये सतारीतून ध्यानधारणाचे अडीचशेहून अधिक प्रयोग त्यांनी सादर केले आहेत.
सतार वादनाचे साडेआठशे कार्यक्रम
अमेरिकेतील असोसिएशन फॉर एक्सपेरिएन्शिअल एज्युकेशन (एईई) संघटनेच्या सात संमेलनांमध्ये त्यांनी "संघ बांधणी व सतारीवरील रागमांडणी यातील साम्यस्थळांचा शोध" या विषयावर विचारमंथन केले आहे.पूर्व युरोपमधील बल्गेरियात सतार वादन करणारे महाजन हे कदाचित पहिलेच भारतीय ठरले आहेत. आजपावेतो महाजन यांचे महाराष्ट्रातील छोट्या खेडोपाड्यांपासून ते पुणे, मुंबई, दिल्ली आणि सातासमुद्रापार अमेरिका,युरोमधील देशांत मिळून साडेआठशेहून अधिक सतार वादनाचे कार्यक्रम झाले आहेत.
विविध पुरस्कारांनी सन्मान
आपल्यातील साहित्यिक जागा करत स्वतःच्या सांगीतिक प्रवासावर ‘एका स्वरवेड्याची आनंदयात्रा’ हे अनुभव कथन महाजन यांनी लिहिले आहे. त्यांच्या ‘मैत्र जीवाचे’ या पुस्तकाला २००९ चा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा कृष्णराव भालेकर उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘शोधयात्रा’ या पुस्तकाला देखील पुरस्कार मिळाले आहेत. ग्रीष्म, गांधार-पंचम आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. या साहित्य लिखाणासाठी महाजन यांना कवी अनंत फंदी पुरस्कार, इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार तसेच गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अभिजातपणापासून दूर नेत शास्त्रीय संगीतामधील गूढवाद दूर करुन, सर्वसामान्यांच्यादृष्टीने त्याला आकलनीय करण्याच्या हेतूने मी प्रयत्नशील असतो. संगीत ऐकून गाई अधिक चांगले दूध देत असतील; त्याच संगीताच्या प्रभावामुळे मनुष्य प्राण्यावर किती सकारात्मक परिणाम घडवता येईल ? त्यासाठी तो मनुष्य विशिष्ट वर्गाचा असण्याची आवश्यकता नसावी.
- विदुर महाजन, सतारवादक, तळेगाव दाभाडे
TLS25B05938, TLS25B05939
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.