ट्रेलरखाली चिरडून एकाचा मृत्यू, एक जखमी
तळेगाव स्टेशन, ता. १४ : तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. १४) सकाळी साडेसहाच्या सुमारास खालुंब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई चौकातील भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाचा अवजड ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
गजानन बाबूराव बोळकेकर (२६, रा. देहूरोड/ मुळ बोलका, ता. कंधार, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे. तो दुचाकीवर मागे बसला होता. दुचाकी चालविणारा आदित्य गजाननराव गायकवाड (२३, रा. जगतगुरू सोसायटी, येलवाडी, ता. खेड, जि. पुणे /मूळ साऊर, ता. भातकुली, जि. अमरावती) जखमी झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्यावर चाकण येथील आस्था रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्याला घरी सोडण्यात आले.
गजानन चाकण एमआयडीसीतील शिंदे वासुली परिसरातील अँटोकॉम्प पानसे कंपनीत मनुष्यबळ विकास विभागात नोकरीला होता. त्याचे तीन महिन्यांपूर्वीच १४ एप्रिलला लग्न झाले होते. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रेलरचालक मोहम्मद अरमान कमरुददीन खान (वय ३०, संगम गल्ली, ९० फुट रोड, सोशलनगर, धारावी, मुंबई/मुळ पूरेबक्श छताईडीह, राणीजोत, ता. तुलसीपुर जि. बलरामपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
---
गजाननचे दुर्दैव
गजाननची बस चुकल्याने कंपनीत जाण्यासाठी तो देहू फाटा येथे पर्यायी वाहनाची वाट पाहत उभा होता. त्यावेळी हात केल्याने तिकडून दुचाकीवरून चाललेल्या आदित्यने त्याला ‘लिफ्ट’ दिली. थोडे पुढे गेल्यावर खालूंब्रे येथे हा अपघात झाला.
---
चिखलामुळे निसरड्या रस्त्यावर अपघातांची मालिका
चिखलामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून दुचाकी घसरून ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने हा अपघात झाल्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ तसेच स्थानिकांकडून समजते. गेल्या महिनाभरात खालुंब्रे चौकातील याच ५० मीटरच्या पट्ट्यात झालेला हा तिसरा प्राणघातक अपघात आहे. आठवड्यापूर्वी एक आणि मे महिन्यात एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणी मृत्यू झाला होता.
तळेगाव-चाकण मार्गालगत खालुंब्रे ग्रामपंचायतीने खोदकाम करून जलवाहिनी टाकली. त्यानंतर मात्र मुरूम टाकून भराई केली गेली नाही. त्यामुळे पवारवाडी ते ओझरा हॉटेल या अर्धा किलोमीटर रस्त्यावर चिखल झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पट्ट्यांची राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कंत्राटदाराने भराई केलेली दिसत नाही. मुख्य रस्त्यावरही नेहमीच कायमस्वरूपी मोठे खड्डे असल्याने रोज अनेक दुचाकी घसरून अपघात होतात. आठवड्यापूर्वी ओझरा हॉटेलसमोर दुचाकी घसरून मेंदूला मार लागल्याने एक महिला गंभीर जखमी झाली.इतर अपघातांत आठवडाभरात किमान तीनहून जास्त गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी अद्यापही या रस्त्याच्या देखभालीबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.
सोमवारच्या अपघाताचे हृदयद्रावक दृश्य पाहून हळललेल्या खालुंब्रे येथील स्थानिक नागरिक कालिदास बोत्रे, विनायक पवार, विशाल बोत्रे, मयूर लिंबोरे, बालाजी तेलंग, गणेश गाडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने खालूंब्रेतील अतिक्रमणे हटवून जवळपास वीस मीटर रस्ता मोकळा केला आहे, मात्र या जागेवर अद्याप पक्के डांबरीकरण झाले नसल्यामुळे खड्डे पडले आहेत. चिखलामुळे रस्ता निसरडा होऊन अपघात होत आहेत. नुकतीच मंजुरी मिळालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम होण्यास भरपूर अवधी जाणार आहे. त्यामुळे खालुंब्रेतील रस्त्याचे पूर्ण पक्के डांबरीकरण करून दुभाजक टाकणे गरजेचे आहे, अशी मागणी खेड पंचायत समितीचे माजी सभापती अमोल पवार यांनी केली.
---
महिनाभरात खालुंब्रे येथील याच ठिकाणी हा तिसरा बळी आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांची मालिका थांबविण्यासाठी मुरुमाऐवजी डांबराने पक्की दुरुस्ती व्हावी आणि दुभाजक टाकण्यात यावेत. कंपन्यांच्या बेशिस्त बसचालक आणि टेंपोचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी.
- कालिदास बोत्रे
---
पवारवाडी ते ओझरा हॉटेलदरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.
- गणेश गाडे
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.