बहिणींच्या रक्षाबंधनाच्या आनंदावर विरजण
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता.५ : टपाल खात्याची अँडव्हान्स पोस्ट टेक्नॉलॉजी (एपीटी) प्रणाली कार्यरत होण्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे स्पीड पोस्ट नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी आलेल्या बहिणींचा हिरमोड झाला. त्यांना नाइलाजास्तव साध्या पद्धतीने किंवा खासगी कुरियरने राख्या भावांकडे पाठवाव्या लागल्या. परंतु, त्या लाडक्या भावापर्यंत वेळेवर पोहोचतील किंवा नाही ? याची चिंता बहिणींना लागली आहे.
भारतीय टपाल विभागात देशभरात नुकत्याच अंमलबजावणी करण्यात आलेल्या नवीन एपीटी अँप्लिकेशन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी गेल्या १ ते ४ ऑगस्टपर्यंत चार दिवस ऑनलाईन प्रणालीमार्फतची सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही नवीन प्रणाली प्रत्यक्षात वापरात आणण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता.५) तांत्रिक अडचणी सुरू झाल्या. त्यामुळे तळेगाव स्टेशनच्या यशवंतनगरमधील टपाल कार्यालयात रक्षाबंधनानिमित्त परगावी, परराज्य आणि परदेशात राख्या पाठविण्यासाठी आलेल्या बहिणींना स्पीड पोस्टची नोंदणी करता आली नाही. बराच वेळ रांगेत ताटकळत थांबून बहिणी शेवटी निराश होऊन परत गेल्या.
सर्व्हरमधील बिघाडामुळे अनेकांना स्पीड पोस्टऐवजी साध्या टपाल सेवेचा आधार घ्यावा लागला. अनेक बहिणींना सामान्य पद्धतीने राखी पाठवावी लागली. पुण्यावरुन टपाल खात्याचे तंत्रज्ञ तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींपुढे अधिकारी, कर्मचारी देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.
खासगी कुरियरची चांदी
गेले ५ दिवस टपाल खात्यात स्पीड पोस्टचे बुकिंग न झाल्याने राखी पोहोचण्यास उशीर नको म्हणून अनेकांनी नाईलाजाने खासगी कुरियर सेवेचा पर्याय निवडला. परिणामी, कुरियर सेवा देणाऱ्यांची चांदी झाली. तर टपाल खात्याला महसूलावर पाणी सोडावे लागले.
नवीन प्रणालीमुळे सर्व्हरवर ताण येत असल्याने लॉग इन होत नाही. टपाल कार्यालयातील इतर आर्थिक व्यवहार आणि पत्र वितरण सुरळीत चालू आहे. फक्त तांत्रिक अडचणीमुळे स्पीड पोस्ट बुकिंग होत नाही.
- प्रेरणा मेश्राम, सब पोस्ट मास्तर, तळेगाव स्टेशन
ग्रामीण भागात कुरियर सेवा पोहोचत नसल्याने राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टाचा एकमेव पर्याय असतो. मात्र, तांत्रिक टपाल खात्यात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे स्पीड पोस्ट सेवा बंद झाली. यंदा राखी वेळेवर पोहोचेल याची शाश्वती नाही.
- सुप्रिया देशमुख, गृहिणी, यशवंतनगर
TLS25B06102
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.