
तळेगाव स्टेशन, ता. २६ : आंबी गावच्या हद्दीत कंजारभाट वस्तीतील गावठी दारू भट्टीवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन हजार लिटर गुळमिश्रित रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आले.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलिस हवालदार अनंत रावण, रमेश घुले यांच्या पथकाने आंबी शिवारातील ओढ्याच्या कडेला बेकायदा चालू असलेल्या गावठी दारू भट्टीवर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास छापा मारला. पोलिस पथकास पाहून भट्टी चालविणारी महिला पळून गेली. कारवाई दरम्यान पोलिस पथकाला एका प्लॅस्टिकच्या टाकीत गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे एक लाख रुपये किमतीचे दोन हजार लिटर गूळमिश्रित कच्चे रसायन आढळून आले. पोलिस पथकाने जप्त मालाचे नमुने तपासणीसाठी घेऊन टाकी फोडून, रसायन जागेवरच जमिनीवर ओतून देऊन नष्ट केले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार रमेश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमानुसार फरारी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.